श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज कबड्डी दिनाच्या निमित्ताने एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कबड्डी क्षेत्रातील महान कार्यासाठी ओळखले जाणारे स्वर्गीय शंकरराव साळवी यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रभर कबड्डी दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीला वंदन करत शाळेने विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द, प्रयत्नशीलता आणि स्वप्नांवर विश्वास निर्माण करणारा उपक्रम आयोजित केला होता.
या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना एका थेट हिरोची भेट मिळाली –
भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलम इनामदार. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अनुभवाची ठाम बाजू घेऊन ते विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले, आणि सुरू झाला त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रवास. त्यांनी आपल्या लहानपणीच्या अडचणी, घरची हलाखीची परिस्थिती, कबड्डीची पहिली ओळख, मोठ्या भावाची साथ, स्थानिक मैदानांवरचा संघर्ष, आणि अखेर भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा प्रवास ओघवत्या शब्दांत मांडला.
सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक आठवणीला मनापासून प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ स्पष्ट दिसत होता. असलम इनामदार केवळ यशाची गोष्ट सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी अपयश, अपमान, दुखापती आणि मानसिक तणाव या सगळ्यांनाही समोर ठेवत यशामागील वास्तव स्पष्ट केलं. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली – परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आत्मविश्वास, कुटुंबाची साथ आणि जिद्द असल्यास यश नक्की मिळते.
या कार्यक्रमाच्या विशेषतेपैकी एक म्हणजे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांची समुपदेशनपर उपस्थिती. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी असलम इनामदार यांना आमंत्रित करण्यामागील उद्देश त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणात सांगितला. त्यांनी हे ही सांगितले की,अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरचं जीवन शिकता येतं – असं जीवन जे खऱ्या अनुभवांवर उभं आहे. त्यांनी असलम यांचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखं कष्ट घेऊन जीवनात पुढे जाण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तमरीत्या पार पडले. पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, महेश मोरे,सुहास गगे, साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, दिग्विजय भोरे,क्रीडा शिक्षक,व्यवस्थापन समिती,इतर शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक आयोजन करत विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.संवादानंतर विद्यार्थ्यांनी असलम इनामदार यांच्यासोबत फोटो काढत, त्यांच्या सहवासात काही क्षण घालवत प्रेरणेचा एक थेट स्पर्श अनुभवला.