Latest Post

बेलापूर( प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष व राजकीय नेते इंद्रनाथ  पाटील थोरात यांच्यावर  जो हल्ला झाला त्या संदर्भात दाखल गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण द्वारे, व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून मोठ्या शिताफीने पोलीसांनी किरण रावसाहेब साळवे  वय 34 वर्षे रा. वॉर्ड नं.02 श्रीरामपूर यास ताब्यात घेऊन  अटक केली असुन त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.                 पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी निषेध करून या घटनेत गुन्हा दाखल करावा अशी मागणी  केली होती. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात  यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात इसमा विरुध्द भा द वि  कलम 118(1) 119(1)304(2)115(2)352 351 (2) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे ज्ञानेश्वर वाघमोडे,भारत तमनर रविंद्र अभंग, यांनी तातडीने सूत्रे हलवुन श्रीरामपूर येथील किरण रावसाहेब साळवी यास ताब्यात घेतले त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जुनं पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

नवी मुंबई ( गौरव डेंगळे): २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा, छत्तीसगड येथे २६ ते ३० जून २०२५ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने व नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयोजनातून, कोपरखैरणे येथील क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे यशस्वीरित्या पार पडली.

या निवड चाचणीला नवी मुंबई, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, हिंगोली, पुणे, नाशिक, अमरावती आदी जिल्ह्यांमधून आलेल्या ज्युनिअर व सब-ज्युनिअर गटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले, तर क्राईस्ट अकॅडमी स्कूलचे संचालक फादर जेसन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले.

या निवड प्रक्रियेला महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष कोरडे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिगारम, बालभारती तज्ञ प्रगती भावसार मॅडम, नवी मुंबई सचिव वैभव शिंदे, तसेच अशोक शिंदे, आशिष ओबेरॉय, सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.


राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे :


➡️ ज्युनिअर मुले :

कृष्णा अहिरे, विवेक साळुंखे, प्रसाद महाले, मयूर बोरसे, प्रताप पौळ, अनंत धापसे


➡️ सब-ज्युनिअर मुले :

ईश्वर मोरे, दिव्यांशु चांद, वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, विर पाटील


➡️ ज्युनिअर मुली :

वेदिका बेंद्रे, मृणाली सरवदे, श्रेया सिंग, सृष्टी शिंदे, मान्यता जैन, अंकिता सरगर


➡️ सब-ज्युनिअर मिश्र दुहेरी :

राजवीर भोसले, सोनाक्षी कदम


➡️ ज्युनिअर मिश्र दुहेरी :

शिवम कदम, श्रेया धावन


प्रशिक्षक : उज्वला शिंदे, शिवदास खुपसे, गणेश आम्ले

संघ व्यवस्थापक : निलेश माळवे


बेलापूर (प्रतिनिधी) – बेलापूर ग्रामपंचायतची ट्रॉली बेलापूर पोलीस स्टेशनसमोर उभी असताना, अज्ञात इसमाने या ट्रॉलीच्या  टायरजवळ आग लावून ती पेटविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी निदर्शनास आली असुन पोलीस स्टेशन समोरच ही घटना घडल्याने ग्रामस्थाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

या बाबत माहिती अशी की सकाळी फिरायला जात असताना  कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बेलापूर ग्रामपंचायत ट्रॉली पेटवण्याचा प्रयत्न केल्याची बाब पत्रकार देविदास देसाई यांच्या लक्षात आली. त्यानी पातळीने तातडीने बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांना घटनेची माहिती दिली अभिषेक खंडागळे सरपंच व बेलापूर ग्रामपंचायत कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी आले व त्यांनी बेलापूर पोलिसांना ही माहिती दिली बेलापूर पोलीस स्टेशन समोरच घटना घडून देखील पोलीस अनभिज्ञ होते , ही ट्रॉली बेलापूर ग्रामपंचायतीच्या कामासाठी वापरली जात होती 

   ट्रॉलीचे मोठे नुकसान टळले असले तरी, ही घटना ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी आहे. बेलापूर पोलिसांच्या दारातच लावलेले वहान जर सुरक्षित नसेल तर इतरांचे काय असा सवाल विचारला जात आहे. ट्रॅक्टरचे नुकसान करणारा इसम हा उक्कलगाव मार्गे बायपास रोडने स्कुटी मोटरसायकल वर आला व स्कुटी बायपासला लावून तो पोलीस स्टेशन समोर उभे असलेल्या ग्रामपंचायतच्या ट्रॉलीजवळ जाऊन त्याने ट्रॉलीचे टायर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सदरील इसम पांढऱ्या रंगाचा रेनकोट घातला होता त्याचबरोबर त्याने तोंड देखील बांधले होते .याचा अर्थ जाणून बुजून त्याने हे कृत्य केले असून पोलिसांनाच एक प्रकारे आव्हानच दिले आहे या बाबत बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मिनाताई साळवी यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला जावून तक्रार दिली . बेलापूरच्या सरपंच साळवी यांच्या तक्रारीवरून सार्वजनिक मालमत्तेचे अज्ञात इसमाने नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी गोमांस विकत असल्याच्या कारणावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसासंमक्ष त्याठिकाणी धाड टाकली असता गोमांस विकणाऱ्यांनी पोलिसा समक्षच बजरंग दल व गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना अरेरवी केली तसेच दोन दिवसापूर्वी गाडीला कट मारल्याच्या संशयावरून उक्कलगाव येथील प्रगतशील शेतकरी खरेदी विक्री देखरेख संघाचे चेअरमन इंद्रनाथ पा.थोरात यांना उक्कलगाव चौकात धक्काबुक्की करण्यात आली.त्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापती झाली असुन त्यांना तातडीने जालना येथील दवाखान्यात न्यावे लागले तसेच गावातील अब्दुल्ला उमर कुरेशी यांची एच एफ डिलक्स ही टु व्हीलर घरासमोरुन चोरुन नेवुन गाडीची तोडफोड करुन साळूंके पेट्रोल पंपासमोर सोमाणी यांच्या शेतांच्या कडेला असलेल्या ओढ्यात सापडली . गाडीचे मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आले असून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ही कुरेशी यांनी केली आहे गावात दोन गटात मारामारी झाली.तेथेही पोलीसासमोरच एका गटाने दुसऱ्या गटाची गाडी फोडली .अशा घटना घडून जर पोलीस बघ्याची भूमिका घेणार असेल न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल विचारला जाता आहे.

हरेगाव (गौरव डेंगळे): हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जागृती आणि योगाचे महत्व पटवून देण्यासाठी शाळेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी विद्यार्थिनींना योग दिनाचे महत्व पटवून देत म्हटले की, “योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची देण आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थिनींनी दररोजच्या दिनचर्येत योगाचा अविभाज्य भाग करावा.”


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास ब्राह्मणे यांनी अतिशय नेटकेपणे आणि उत्साही पद्धतीने केले. विद्यार्थिनींनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमामध्ये क्रीडाशिक्षक नितीन बलराज यांनी योगासने,त्यांची शास्त्रीय माहिती आणि त्याचे शारीरिक-मानसिक फायदे याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वरिष्ठ शिक्षिका विजया क्षीरसागर यांनी योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना सकारात्मक विचारसरणी,मनःशांती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण शाळा प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

बेलापूर, प्रतिनिधी – "श्रीरामपूर व बेलापूर परिसरात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसिंग हा प्रकार औषधालाही उरलेला नाही," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

श्रीरामपूर व बेलापूर परिसरात बाहेरगावचे गुन्हेगार खुलेआम अवैध धंदे चालवत असून, गुटखाबंदी असताना गुटख्याची सर्रास विक्री, अमली पदार्थांची निर्मिती, गोवंश कत्तली यावर पोलिसांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही, असे मुथा म्हणाले.

"बिंगो" नावाने सुरू असलेला जुगार

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर व सोनई परिसरातील गुन्हेगार श्रीरामपूरात "बिंगो" नावाने जुगाराचे अड्डे चालवत असल्याचे मुथा यांनी निदर्शनास आणले.

गुन्हेगारांचा मुक्तसंचार गावठी कट्यांचा वापर, अल्पवयीन मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण, अल्प्राझोलमसारख्या अमली पदार्थांचे तेलंगणाशी असलेले संबंध, यामुळे श्रीरामपूर परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाल्याची टीका त्यांनी केली.

बेलापूर पोलिसांची स्थिती आणखी बिकट

बेलापूर पोलिस औटपोस्टसमोर टोळीयुद्ध होणे, कोल्हार रोडवरील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, झेंडा चौकातील वाहतुकीचा बट्याबोळ, टायर दुकान व व्यापाऱ्याचे अपहरण या सर्व घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुटखा व गोवंश प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका

गुटखा ट्रक प्रकरणात केवळ पंटरांना अटक होऊन प्रमुख आरोपी सुरक्षित राहणे, बेकरीत सापडलेले गोमांस व कोल्हार चौकाजवळ सुरू असलेली गोवंश कत्तल याकडे पोलिसांचे डोळेझाक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजे बंदीचा ठरावही धाब्यावर

ग्रामसभेने डीजे बंदीचा ठराव करून पोलिसांना लेखी कळवले असतानाही गावात खुलेआम डीजे वाजवले जातात. काही लोक माफक शुल्क घेऊन नवीन मिरवणुकांना परवानग्या मिळवत असून, या मिरवणुकांत तरुणांचा उन्माद दिसून येतो, असेही ते म्हणाले.

तक्रारी दडपल्या जातात

"गुन्ह्यांची नोंद न करता तक्रारदारांची बोळवण केली जाते, केवळ तक्रार अर्ज घेऊन प्रकरण झाकले जाते," अशी गंभीर टीकाही मुथा यांनी केली.

नवीन पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षा

नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना जिल्ह्याचा अनुभव असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बेजबाबदारपणा थांबवतील अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य कृतीत उतरावे, हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय असल्याच्या आरोपाने वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत थेट पत्रक प्रसिद्ध करत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून कडव्या शब्दांत इशारा दिला आहे. या पत्रकाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या वतीने स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.


एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षणात बदल करत, पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या निर्णयानुसार मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषा सक्तीची असेल, असे संकेत देण्यात आले होते. सुरुवातीला आलेल्या निर्देशांनुसार तीनही भाषांचे पाठ्यपुस्तक छपाईला गती देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि त्यानंतर अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि भाषाप्रेमींनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त उत्तरेतील काही राज्यांमध्ये बोलली जाते. महाराष्ट्रात तिची सक्ती करण्याचा कुठलाही नैतिक किंवा शैक्षणिक आधार नाही.” त्यांनी शिक्षण विभागावर निशाणा साधत सांगितले की, “सरकारने आधी हिंदी सक्ती करणार असल्याचा अप्रत्यक्ष निर्णय घेतला, नंतर जनमत पाहून गुपचूप मागे फिरलं, मात्र अद्याप त्याचा कोणताही स्पष्ट लेखी आदेश सादर केलेला नाही.” राज ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना उद्देशून आवाहन केले की, “तिसऱ्या भाषेचा शिकवण्याचा निर्णय तुम्ही अंमलात आणू नका. सरकारने अजून स्पष्ट आदेश दिलेले नाहीत आणि तरीही पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार गुप्तपणे ही भाषा लादण्याच्या प्रयत्नात आहे. याला शाळांनी सहकार्य करू नये.”


 जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितले , इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा शिकवण्याचा ताण टाकणे हे शैक्षणिक दृष्टिकोनातून अयोग्य आहे. शिवाय मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा पुरेशा असून, राज्यभाषा म्हणून मराठीचे स्थान अबाधित ठेवणे हीच प्रत्येक शाळेची प्राथमिक जबाबदारी आहे. “हिंदी शिकवली काय, नाही काय, त्याचा उपयोग काहीच नाही. पुढे मुलांना आवश्यक वाटल्यास कोणतीही भाषा ते शिकू शकतात. पण लहान वयात ओझं टाकून सरकार नेमकं कोणतं राजकारण करतंय हे समजायला हवं,” असे ते आपल्या भाषणातून बोलले या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. यामध्ये हिंदी सक्तीविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून शाळांनी सरकारच्या गुप्त हेतूंना पाठबळ देऊ नये, अशी मागणी केली आहे.


मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांनी सांगितले आहे की, “जर सरकारने तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला नसेल तर त्याचा स्पष्ट लेखी आदेश प्रसिद्ध करावा. अन्यथा आम्ही हे सरकारचा डाव समजून विरोध करत राहू.” तसेच, जर शाळांनी सरकारच्या दबावाखाली काम केलं, तर त्याला “महाराष्ट्र द्रोह” समजले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मनसेने या आंदोलनातून स्पष्ट केले आहे की, ही केवळ भाषा शिकवण्याची चर्चा नसून, त्यामागे असलेला ‘सांस्कृतिक कब्जा’ रोखणे ही आपली जबाबदारी आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीमुळे मराठी भाषेचा सायास होत आहे, आणि त्यातच शैक्षणिक पातळीवर हिंदी लादली गेल्यास मराठीचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे.


या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, तालुका संघटक विलास पाटणी,तालुका सचिव भास्कर सरोदे,शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव अभिजीत, शहर सरचिटणीस सचिन कदम, गायकवाड, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी, शहर सरचिटणीस नितीन जाधव, शहर उपाध्यक्ष संदीप विश्वंभर, संदीप पिंटो, लखन कुरे, डॉक्टर प्रसाद पऱ्हे, शहर विभागाध्यक्ष चेतन दिवटे, विनोद शिरसाठ, विद्यार्थी सेना शहर संघटक राहुल शिंदे,

यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत.

कोपरगांव (गौरव डेंगळे):दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.

योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.


त्याचेच औचित्य साधत सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे पतंजली योग पिठाचे योगाचार्य उदय वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० विध्यार्थी आणि शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.

२०२५ सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती – “Yoga for Self and Society” (स्वतःसाठी आणि समाजासाठी योग).

ही संकल्पना फक्त स्वतःच्या आरोग्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करते.


योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा असून, ती नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच संपूर्ण जग या दिवशी योग साधनेसाठी एकत्र येते.

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे, प्राथमिक पर्यवेक्षिका सौ. पल्लवी ससाणे, प्री-प्रायमरी पर्यवेक्षिका सौ. नाथलीन फर्नांडिस तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांसोबत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget