Latest Post

हरेगाव (गौरव डेंगळे): हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जागृती आणि योगाचे महत्व पटवून देण्यासाठी शाळेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी विद्यार्थिनींना योग दिनाचे महत्व पटवून देत म्हटले की, “योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची देण आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थिनींनी दररोजच्या दिनचर्येत योगाचा अविभाज्य भाग करावा.”


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास ब्राह्मणे यांनी अतिशय नेटकेपणे आणि उत्साही पद्धतीने केले. विद्यार्थिनींनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमामध्ये क्रीडाशिक्षक नितीन बलराज यांनी योगासने,त्यांची शास्त्रीय माहिती आणि त्याचे शारीरिक-मानसिक फायदे याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वरिष्ठ शिक्षिका विजया क्षीरसागर यांनी योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना सकारात्मक विचारसरणी,मनःशांती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण शाळा प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

बेलापूर, प्रतिनिधी – "श्रीरामपूर व बेलापूर परिसरात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसिंग हा प्रकार औषधालाही उरलेला नाही," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

श्रीरामपूर व बेलापूर परिसरात बाहेरगावचे गुन्हेगार खुलेआम अवैध धंदे चालवत असून, गुटखाबंदी असताना गुटख्याची सर्रास विक्री, अमली पदार्थांची निर्मिती, गोवंश कत्तली यावर पोलिसांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही, असे मुथा म्हणाले.

"बिंगो" नावाने सुरू असलेला जुगार

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर व सोनई परिसरातील गुन्हेगार श्रीरामपूरात "बिंगो" नावाने जुगाराचे अड्डे चालवत असल्याचे मुथा यांनी निदर्शनास आणले.

गुन्हेगारांचा मुक्तसंचार गावठी कट्यांचा वापर, अल्पवयीन मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण, अल्प्राझोलमसारख्या अमली पदार्थांचे तेलंगणाशी असलेले संबंध, यामुळे श्रीरामपूर परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाल्याची टीका त्यांनी केली.

बेलापूर पोलिसांची स्थिती आणखी बिकट

बेलापूर पोलिस औटपोस्टसमोर टोळीयुद्ध होणे, कोल्हार रोडवरील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, झेंडा चौकातील वाहतुकीचा बट्याबोळ, टायर दुकान व व्यापाऱ्याचे अपहरण या सर्व घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुटखा व गोवंश प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका

गुटखा ट्रक प्रकरणात केवळ पंटरांना अटक होऊन प्रमुख आरोपी सुरक्षित राहणे, बेकरीत सापडलेले गोमांस व कोल्हार चौकाजवळ सुरू असलेली गोवंश कत्तल याकडे पोलिसांचे डोळेझाक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजे बंदीचा ठरावही धाब्यावर

ग्रामसभेने डीजे बंदीचा ठराव करून पोलिसांना लेखी कळवले असतानाही गावात खुलेआम डीजे वाजवले जातात. काही लोक माफक शुल्क घेऊन नवीन मिरवणुकांना परवानग्या मिळवत असून, या मिरवणुकांत तरुणांचा उन्माद दिसून येतो, असेही ते म्हणाले.

तक्रारी दडपल्या जातात

"गुन्ह्यांची नोंद न करता तक्रारदारांची बोळवण केली जाते, केवळ तक्रार अर्ज घेऊन प्रकरण झाकले जाते," अशी गंभीर टीकाही मुथा यांनी केली.

नवीन पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षा

नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना जिल्ह्याचा अनुभव असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बेजबाबदारपणा थांबवतील अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य कृतीत उतरावे, हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय असल्याच्या आरोपाने वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत थेट पत्रक प्रसिद्ध करत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून कडव्या शब्दांत इशारा दिला आहे. या पत्रकाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या वतीने स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.


एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षणात बदल करत, पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या निर्णयानुसार मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषा सक्तीची असेल, असे संकेत देण्यात आले होते. सुरुवातीला आलेल्या निर्देशांनुसार तीनही भाषांचे पाठ्यपुस्तक छपाईला गती देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि त्यानंतर अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि भाषाप्रेमींनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त उत्तरेतील काही राज्यांमध्ये बोलली जाते. महाराष्ट्रात तिची सक्ती करण्याचा कुठलाही नैतिक किंवा शैक्षणिक आधार नाही.” त्यांनी शिक्षण विभागावर निशाणा साधत सांगितले की, “सरकारने आधी हिंदी सक्ती करणार असल्याचा अप्रत्यक्ष निर्णय घेतला, नंतर जनमत पाहून गुपचूप मागे फिरलं, मात्र अद्याप त्याचा कोणताही स्पष्ट लेखी आदेश सादर केलेला नाही.” राज ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना उद्देशून आवाहन केले की, “तिसऱ्या भाषेचा शिकवण्याचा निर्णय तुम्ही अंमलात आणू नका. सरकारने अजून स्पष्ट आदेश दिलेले नाहीत आणि तरीही पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार गुप्तपणे ही भाषा लादण्याच्या प्रयत्नात आहे. याला शाळांनी सहकार्य करू नये.”


 जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितले , इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा शिकवण्याचा ताण टाकणे हे शैक्षणिक दृष्टिकोनातून अयोग्य आहे. शिवाय मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा पुरेशा असून, राज्यभाषा म्हणून मराठीचे स्थान अबाधित ठेवणे हीच प्रत्येक शाळेची प्राथमिक जबाबदारी आहे. “हिंदी शिकवली काय, नाही काय, त्याचा उपयोग काहीच नाही. पुढे मुलांना आवश्यक वाटल्यास कोणतीही भाषा ते शिकू शकतात. पण लहान वयात ओझं टाकून सरकार नेमकं कोणतं राजकारण करतंय हे समजायला हवं,” असे ते आपल्या भाषणातून बोलले या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. यामध्ये हिंदी सक्तीविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून शाळांनी सरकारच्या गुप्त हेतूंना पाठबळ देऊ नये, अशी मागणी केली आहे.


मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांनी सांगितले आहे की, “जर सरकारने तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला नसेल तर त्याचा स्पष्ट लेखी आदेश प्रसिद्ध करावा. अन्यथा आम्ही हे सरकारचा डाव समजून विरोध करत राहू.” तसेच, जर शाळांनी सरकारच्या दबावाखाली काम केलं, तर त्याला “महाराष्ट्र द्रोह” समजले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मनसेने या आंदोलनातून स्पष्ट केले आहे की, ही केवळ भाषा शिकवण्याची चर्चा नसून, त्यामागे असलेला ‘सांस्कृतिक कब्जा’ रोखणे ही आपली जबाबदारी आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीमुळे मराठी भाषेचा सायास होत आहे, आणि त्यातच शैक्षणिक पातळीवर हिंदी लादली गेल्यास मराठीचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे.


या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, तालुका संघटक विलास पाटणी,तालुका सचिव भास्कर सरोदे,शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव अभिजीत, शहर सरचिटणीस सचिन कदम, गायकवाड, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी, शहर सरचिटणीस नितीन जाधव, शहर उपाध्यक्ष संदीप विश्वंभर, संदीप पिंटो, लखन कुरे, डॉक्टर प्रसाद पऱ्हे, शहर विभागाध्यक्ष चेतन दिवटे, विनोद शिरसाठ, विद्यार्थी सेना शहर संघटक राहुल शिंदे,

यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत.

कोपरगांव (गौरव डेंगळे):दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.

योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.


त्याचेच औचित्य साधत सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे पतंजली योग पिठाचे योगाचार्य उदय वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० विध्यार्थी आणि शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.

२०२५ सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती – “Yoga for Self and Society” (स्वतःसाठी आणि समाजासाठी योग).

ही संकल्पना फक्त स्वतःच्या आरोग्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करते.


योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा असून, ती नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच संपूर्ण जग या दिवशी योग साधनेसाठी एकत्र येते.

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे, प्राथमिक पर्यवेक्षिका सौ. पल्लवी ससाणे, प्री-प्रायमरी पर्यवेक्षिका सौ. नाथलीन फर्नांडिस तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांसोबत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

खंडाळा (गौरव डेंगळे) : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे आज खंडाळा गावात उत्साहात व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.फुलांनी सजवलेल्या रांगोळ्यांमधून, तसेच भजन-कीर्तनाच्या मंगलध्वनीत संपूर्ण गावाने एकत्र येत दिंडीचे स्वागत केले.

या प्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे यांचा राष्ट्रीय श्रीराम संघ खंडाळा व गावकऱ्यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.यावेळी खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने दिंडीसाठी दुपारच्या जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये आमटी,चपाती आणि भाकरीचा समावेश होता.भाविकांसाठी ही भोजन व्यवस्था अत्यंत प्रेमपूर्वक आणि सुयोग्य पद्धतीने पार पडली.

राष्ट्रीय श्रीराम संघ खंडाळा यांच्या वतीने राजगिरी लाडूंच्या पॅकेटचे वाटप करण्यात आले, जेणेकरून वारकऱ्यांना पोषणमूल्ययुक्त प्रसाद मिळावा.

दिंडीमध्ये सहभागी वारकरी, महिला भक्त मंडळ,तसेच लहान मुलांचे टाळ-मृदंग व भजन पथक यांनी वातावरण भक्तिमय करून टाकले.गावातील युवकांनी वाहतूक व नियोजनामध्ये मोलाची जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. नवनाथ महाराज यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शन करत संत निवृत्तीनाथांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि वारकरी संप्रदायाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.खंडाळा गावातील या स्वागताने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून,परंपरेला साजेसा उत्सव मोठ्या श्रध्देने व प्रेमाने साजरा करण्यात आला.

खंडाळा(गौरव डेंगळे):श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात आज एक ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला, जेव्हा समाजसेवेत अग्रणी आणि युवकांसाठी प्रेरणास्थान असलेले वसंत हंकारे सर यांनी गावाला भेट दिली.

या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय श्रीराम संघ,खंडाळा आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हंकारे सर यांचा भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक,ज्येष्ठ मंडळी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या वेळी हंकारे सर यांनी खंडाळ्यातील युवकांच्या उत्साहाचे आणि सामाजिक भानाचे कौतुक करत सांगितले की,

"प्रत्येक गावात भगवा ध्वज फडकायला हवा.भगवा हा केवळ ध्वज नाही,तो जनतेच्या रक्षणाचा प्रतीक आहे."

त्यांच्या या प्रेरणादायी उद्गारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची आणि समाजसेवेची भावना अधिक तीव्र झाली.हंकारे सर यांनी गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे दर्शन घेऊन त्याच्या निर्मितीमागील संघटित प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.या ध्वजस्थळाने गावातील युवकांमध्ये अभिमान व नवचेतना निर्माण केली आहे.

सरांनी युवकांशी संवाद साधत संघटन,शिस्त,शिक्षण आणि स्वाभिमान या मूल्यांवर भर देत त्यांना समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.खंडाळा गावातील युवकांच्या राष्ट्रनिष्ठ वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या मातीत नवसंस्कार निर्माण होत आहेत," असे गौरवोद्गार हंकारे सरांनी काढले.कार्यक्रमाची सांगता सर्वांच्या मनात प्रेरणादायी ठसा उमटवत झाली.गावासाठी ही भेट एक अभिमानाचा क्षण ठरली असून, युवकांच्या कार्याला यातून नवी दिशा मिळाली आहे.

श्रीरामपूर: दिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा आणि ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन दै. जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांनी केले. श्रीरामपूर येथे माजी मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून दिव्यांगांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संजय साळवे यांच्या कार्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांगांच्या ९९% समस्या मार्गी लागल्या आहेत, असे आगे यांनी नमूद केले. दिव्यांगांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले, तसेच श्रीरामपूर तालुका दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात एक पथदर्शी प्रकल्प ठरत असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात श्रीरामपूर शहरातील सामाजिक जाणीव असलेले निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावला. संजय साळवे अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवत असून, ते दिव्यांगांसाठी देवसमान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील यांनी सांगितले की, मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना राबवली जाईल.

निलेश शिंदे यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, खजिनदार सौ. साधना चुडीवाल, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, राज्य समन्वयक विनोद कांबळे सर, भारत मुक्ती मोर्चाचे सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताकभाई तांबोळी यांनी केले, तर वर्षा गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतुभाऊ मावरे, दिनेश पवार, सतीश साळवे, फिरोज शेख, सागर म्हस्के यांनी विशेष प्रयत्न केले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget