Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-अल्पवयीन विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून त्रास देणार्‍या तरूणास जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.बेलापूर परिसरात राहणार्‍या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा आरोपी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याने पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून छेड काढत त्रास दिला. त्याबाबत विद्यार्थीनीने झालेला प्रकार वडिलांना सांगितला. वडील संबंधित तरुणाला जाब विचारण्यास गेले असता त्याने विद्यार्थीनीच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विद्यार्थीनीच्या आईला ढकलून दिले व विद्यार्थीनीला पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला.याप्रकरणी मुलीचे आई-वडील व अल्पवयीन विद्यार्थीनीने थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354 ड, 341, 323, 504, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पोक्सो कायदा 2012 चे कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करुन विलास भगत याला अटक केली. पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक बोर्से हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी-पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात बेकायदेशीररित्या गॅस रिफील करणार्‍या अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत 39 गॅस टाक्यांसह 80 हजार 820 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरूण पोपट वरखडे (वय 36, रा. वरखडेवस्ती, निघोज) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई मयूर गायकवाड यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने एलसीबीचे पथक पारनेर तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान निघोजच्या वरखडेमळा परिसरात अरूण वरखडे बेकायदेशिररित्या गॅस रिफील करत असल्याची माहिती सहायक निरीक्षक दिनकर मुंढे यांना मिळाली होती.माहितीच्या आधारे एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता आरोपी वरखडे घराच्या आडोशाला गॅसच्या एका टाकीतून दुसर्‍या टाकीत गॅस रिफील करताना आढळून आला. त्याच्याकडे परवानासंदर्भात चौकशी केला असता तो विनापरवाना गॅस रिफील करत असल्याचे निर्दशनास आले.निरीक्षक कटके यांच्या सुचनांप्रमाणे सहायक निरीक्षक मुंढे, अंमलदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, राहुल साळुंके, सागर ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



नाशिक प्रतिनिधी -शहरात गेल्या महिनाभरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरु आहे. त्यात कालच झालेल्या आनंदवली येथील पाइपलाइन रोडजवळ कॅनॉलरोडलगत पवन पगारे याच्यावर चाकुने वार होऊन त्याची हत्या झाली. हा आरोपी अतुल अजय सिंग हा खून करुन हातात रक्ताने माखलेला धारदार चाकू घेऊन युवक पळत होता. त्याचवेळी गंगापुर पोलिस ठाण्यात कर्तव्यदक्ष महिला पोलीस सरला खैरनार यांनी पाठलाग करुन संशयिताकडून चाकू हिसकावत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.या कामगिरीबद्दल खैरनार यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे. प्रभागाचे नगरसेवक व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी खैरनार यांचे अभिनंदन करताना प्रशंसोद्गार काढले. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख, बागुल, संकेत घोलप, राजू सिद्धू, राहुल उन्हाळे, अनिल पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.भाजपच्या वतीने आ. सीमा हिरे यांनी खैरनार यांना शाबासकीची थाप आणि पैठणी देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सरला खैरनार यांचे पती विजय खैरनार व संपूर्ण परिवार उपस्थित होता. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरिक्षक रियाज शेख, माजी नगरसेविका हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश हिरे, भगवान काकड, नारायण जाधव, पुर्वा सावजी, रामहरी संभेराव, रोहिणी नायडू, अनिल भालेराव आदींसह महिला व पुरुष पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तंबाखू विरोधी दिन निमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न  श्रीरामपूर प्रतिनिधी - आनंदी जीवन जगण्यासाठी व्यक्तीने व्यसनाला जवळ न करता त्याचा त्याग करायला हवा. तंबाखू युक्त पदार्थांचे सेवन हे कुटुंबापासून स्वतःला खूप लवकर दूर नेण्याचे साधन असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.  इंडियन मेडिकल असोसिएशन,श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन,माहेश्वरी हरियाली मंच व सार्थक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मे या जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर स्पर्धेचा परितोषिक सोहळा लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला,त्यात प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रशांत पाटील बोलत

होते.मंचावर डॉ.संकेत मुंदडा,डॉ.रविंद्र कुटे, डॉ. दिलीप शेज्वळ,डॉ. मोनिका संचेती, उमेश तांबडे,रमाताई पोफळे आदी उपस्थित होते.

प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणात व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी वैद्यकीय संघटना या सामाजिक क्षेत्रातील संघटनांना सोबत घेवून काम करत असल्याचे बघून अभिमान वाटत असल्याचे म्हटले.कोविड काळातील सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांनी केलेले सहकार्य वाखाणण्याजोगे होते.    

 कुटुंबावर खरा प्रेम करणारा व्यक्ती कधीही तंबाखू सारख्या संसार उद्ध्वस्त करणाऱ्या बाबींना जवळ करत नाही.समाजात कुटुंबावर खोटी प्रेम करणारी अर्थात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी अनेक मंडळी दिसून येतात.खुल्या पोस्टर स्पर्धेतून सहभागी स्पर्धकांनी खूपच बोलकी चित्रे काढली.समाजाने त्यातून बोध घेण्याचे आवाहन करताना कुटुंबासाठी अधिकाधिक वेळ खर्च करण्याची विनंती देखील प्रशांत पाटील यांनी केली.याप्रसंगी डॉ.रवींद्र कुटे,डॉ.संकेत मुंदडा,डॉ.मोनिका संचेती यांचीही भाषणे झाली.


          पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या 152 स्पर्धकातून डॉ.सुभाष गल्हे यांनी निवड प्रक्रियेतून विजेते घोषित केले.विजेत्यांना प्रशांत पाटील यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आली.डॉ.राहुल राऊत व डॉ.सुनीता राऊत यांचेकडील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रणवीर हिवाळे यांनी द्वितीय क्रमांकाचे डॉ.गणेश बैरागी व डॉ.नेहा बैरागी यांचेकडील पारितोषिक श्रीमती रेखा त्रिभुवन यांनी तर डॉ.विनोद बागुल व डॉ.अमृता बागुल यांचेकडे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रकाश गायकवाड यांनी पटकावले.समीर याकूब बागवान,रमाताई पोकळे,डॉ.दिलीप शेज्वळ यांचेकडील उत्तेजनार्थ पारितोषिक कु.नाजिया मंसुरी, कु.तनिष्का शिंगे व कु.तुलसी न्याती यांनी मिळवले.सर्व स्पर्धकांना रमेश कापडीवाल यांनी प्रमाणपत्र देऊ केले.

कार्यक्रमासाठी डॉ.दिलीप पडघन,डॉ.राम कुकरेजा,डॉ.केतन बधे,डॉ.प्राजक्ता टांक,डॉ.वर्षा शिरसाठ,राखी बिहाणी,नम्रता मुंदडा,शिरीष सूर्यवंशी,जालिंदर जाधव,किशोर बत्तीसे विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.          

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता टांक यांनी तर आभारप्रदर्शन शकील बागवान यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - कधीकाळी शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध असलेली श्रीरामपूर नगरपालिका सध्या शहरवासीयांना अस्वच्छ आणि अपुरा पाणीपुरवठा करीत आहे. शिवाय दररोज विविध भागांमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा संदर्भात पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. आंदोलने केली. तरी सुद्धा पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची तातडीने बदली करून सक्षम असा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

शहराच्या विविध भागात असलेल्या पालिकेचे जलकुंभ भरल्यानंतर अनेक तास पाणी वाया जाते. संजय नगर पाण्याची टाकी, मोरगे वस्ती वरील पाण्याची टाकी, कांदा मार्केट परिसरातील पाण्याची टाकी या भागांमध्ये टाक्या भरल्यानंतर सुद्धा अनेक तास पाणी वाया जाते. तेथे कोणताही वाचमेन किंवा पाणीपुरवठा कर्मचारी नसतो. संजय नगर परिसरातील पाण्याची टाकी तर वरूनच ओव्हर फ्लो होते तर मोरगे वस्ती येथील पाण्याच्या टाकीच्या पाईप लाईन मधून ओव्हर फ्लोचे पाणी तासनतास शेजारी शेतात सोडले जाते.


गोंधवणी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यासाठी जाणार्‍या मेन पाईपलाईन वरील वाल्व नेहरूनगर परिसरामध्ये गेल्या एक वर्षापासून लीक असून तेथे 24 तास मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तिथे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष आहे.

वैदुवाडा अहिल्या देवी नगर परिसरामध्ये नागरिकांना मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिल्याने प्रत्येक वेळी तेथे नळांना पाणी येते. दिवसातून पाच वेळा त्या ठिकाणी पाणी येते व पाच वेळा पाणी आल्याने या भागातील नागरिकांच्या नळांना तोट्या नसल्याने तेथे सुद्धा लाखो लिटर पाणी दररोज वाया जाते. शहराला दररोज 40 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. शहराच्या सर्व भागातील हे वाया जाणारे पाणी रोखल्यास शहरात एक तास पाणी पुरवठा करता येईल अशी परिस्थिती आहे. परंतु पाणी पुरवठा विभागाचे अक्षम्य हलगर्जीपणामुळे पाण्याची नासाडी होत आहे.

मिल्लत नगर परिसरातील पाण्याबाबत गेले अनेक महिने बोंबाबोंब सुरू आहे. गेल्या महिन्यात या भागातील जलवाहिनी मध्ये मोठा दगड सापडला.त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला तर काही भागामधला पाणीपुरवठा एक अत्यंत कमी झाला. कांदा मार्केट परिसरातील नागरिकांनी देखील पाण्यासाठी आंदोलन केले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी टंचाईचे व पाणी वाया जाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वीच्या काळी नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग अत्यंत सक्षम होता. शहराच्या सर्व भागांमध्ये बारकाईने लक्ष ठेवून पाण्याची नासाडी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात होते. मात्र सध्या पाणी पुरवठा विभाग ढेपाळला गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याच्या विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी मागील आठवड्यामध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. तरी पण याबाबत कोणतीही सुधारणा झालेली नाही. पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने याबाबत दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- दि.24/05/2020 रोजी जागेच्या वादावरुन फरार महिला आरोपी नामे प्रमिला धोंडीराम इंगळे  व इतर आरोपींनी मिळून मयत नामे गणेश गवळीराम साळवे वय 28 वर्ष रा. लाटे वस्ती निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर यांची कुऱ्हाड,कोयता, गावठी कट्टा व इतर शस्त्राच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हौशीराम गवळीराम साळवे यांच्या फिर्यादीवरून गु. र. नं. 950/2020 भा.द.वि. कलम 302,326,324,143,147,148,149,504,506 सह  आर्म ॲक्ट 3,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज दि.30/05/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना  गुप्त बातमीदारा मार्फत  खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार महिला आरोपी प्रमिला धोंडीराम इंगळे ही  आपले नाव व वेश  बदलून वडाळा महादेव परिसरात  येणार आहे त्यानुसार त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करुन आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वडाळा महादेव परिसरात सापळा लावून महिला आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले आहे व पुढील कार्यवाहीसाठी श्रीरामपूर शहर  पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर, Dy.s.p  संदीप मिटके , यांचे मार्गदर्शनाखाली म. पो. ना.अश्विनी पवार, पो. ना.नितीन चव्हाण, पो.कॉ. विलास उकिरडे यांनी केली.

अहमदनगर प्रतिनिधी - धनादेश न वटल्याने आरोपीस ६ महिने कारावासाची शिक्षा व फिर्यादीस नुकसान भरपाई पोटी रुपये १ लाख ५० हजार एक महिन्यात देण्याचा आदेश व रक्कम न दिल्यास अतिरिक्त ४ महिन्याचा कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी कि, मे २०१८ मध्ये आरोपी सचिन बाबासाहेब नवघने (रा. नवघने स्वॉमील, भवानी पेठ, पुणे) याने त्याचे व्यवसायाकरीता रक्कम १ लाख १५ हजारची हबीब शेख हुसेन (रा. बेलदारगल्ली, अहमदनगर) यांचेकडून उसनवारीने घेऊन आपसात ठरल्याप्रमाणे एक महिन्यात परत दिली नाही, म्हणून रक्कमेची मागणी केली. आरोपीने रोख रक्कम न देता त्याचे खाते बॅक खात्यावरील रक्कम रुपये १ लाखचा चेक देऊन तो निश्चित वटण्याची खात्री व भरवसा दिलेला. फिर्यादीने तो चेक त्यांचे खाते असलेल्या बॅकेत भरला असता तो चेक वटण्याइतपत पुरेशी रक्कम आरोपीचे खात्यात शिल्लक नसल्यामुळे चेक “फंडस इन सफिशिएंट ” असा शेरा मारुन न वटता परत आला. याबाबत आरोपीस कळविले असता, आरोपीने तो चेक पुन्हा तीन महिन्याने भरण्याची विनंती केली असल्याने, तो चेक फिर्यादीने दुसऱ्यांदा बँकेत भरला असता तो पुन्हा आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने न वटता परत आला असल्याने आरोपीस वकीलामार्फत नोटीसही देण्यात आली. आरोपीने फिर्यादीची रक्कम परत दिलेली नसल्याने, फिर्यादीने आरोपी विरुध्द अहमदनगर येथील चिफ ज्युडि मॅजि. साहेब अहमदनगर यांचे न्यायालयात एस सी सी केस नं. ५९०९/२०१८ ची दाखल केली. केसमध्ये दोन्ही बाजुचा लेखी व तोंडी पुरावा पाहून, आरोपीने व त्याचे खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही, याची माहिती असताना देखील फिर्यादीस न वटणारा चेक देऊन फिर्यादीची घोर फसवणूक केलेली आहे, असे न्यायालयात प्रथमदर्शनी शाबीत झालेले असल्याने, दि. २७ मे २०२२ रोजी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्रीयुत डी. आर. दंडे यांनी आरोपीस दोषी धरुन, आरोपीस ६ महिने कारावासाची शिक्षा व फिर्यादीस नुकसान भरपाई पोटी रुपये १ लाख ५० हजार एक महिन्यात देण्याची शिक्षा सुनावलेली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास आरोपीस अतिरिक्त ४ महिन्याचा कारावास सोसावा लागणार आहे. प्रकरणामध्ये फिर्यादी तर्फे ॲड सुबोध सुधाकर जाधव (अहमदनगर) यांनी काम पाहिले. त्यांना ॲड शैलेंद्र राजाराम शिंदे, ॲड. सिध्दांत भाऊसाहेब शिंदे यांनी सहाकार्य केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget