आखेर आरोपी संजय गायकवाड हॉस्पिटल मधुन अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी.
बुलडाणा - 9 ऑक्टोबर
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथील आरोपी संजय गायकवाड याला 6 ऑक्टोबर रोजी नागरीकांनी झोडपुन काढल्याने तो जख्मी झाल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आला होता. त्याला रुग्नलयातून डिस्चार्ज मिळाल्याने पोलिसांनी त्याला आज 9 ऑक्टोबरला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
6 ऑक्टोबर रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गतचे ग्राम अंभोडा येथील पीडित 10 वर्षीय बालिकेचे आई- वडील सोयाबीन सोंगणीसाठी शेतात गेले होते. बालिका शेजारी खेळत असताना आरोपी संजय अर्जुन गायकवाड याने बालिकेला घरामागे घेऊन गेला. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आरडाओरड केली असता बालिकेचे आजोबा व भाऊ धावून आले तर आरोपी संजय गायकवाड पळून गेला होता, मात्र लोकांनी त्याला चांगले चोपून काढले होते. त्यामूळे पोलिसांनी जखमी आरोपीला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.आरोपीविरुद्ध 7 ऑक्टोबर रोजी बलात्कार व पोक्सो अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज 9 ऑक्टोंबरला आरोपीला डिस्चार्ज मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालया समोर हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर व दिलीप बोरसे करत आहेत.