Latest Post

शिर्डी प्रतिनिधि - दि.7: कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. सार्वजनिक संपर्क टाळावा. सर्व नागरिकांनी हे नियम पाळले, तर ही परिस्थिती बदलेल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 25 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील एक युवक हा पुणे येथे ससून हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात भरती असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्या घशातील स्त्रावही तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील आतापर्यंत ७६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाठविलेल्या पैकी २४ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले तर श्रीरा्मपूर येथील युवकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तो पुणे येथील ससून रुग्णालयात भरती आहे. बाधित रुग्णांपैकी ११ जण नगर (परदेशी रुग्णांसह), जामखेड ०६ (परदेशी रुग्णासह), संगमनेर ०४, राहाता-०१, नेवासा- ०२ आणि श्रीरामपूर ०१येथील आहेत. या बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. काल रात्रीपर्यंत ८४ व्यक्तींचे घशातील स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तर ६१ व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले असून ते आज पाठविण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
            जिल्हा यंत्रणेने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, कोरोनाची संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे सध्या औषधी साठा आहे. जास्त संख्येने पीपीई कीट मिळण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणे झाल्याचे ते म्हणाले.
            कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने जिल्हा बंदी जाहीर केली. त्यामुळे बाहेरील स्थलांतरित, मजूर यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्रशासनाने आणि खासगी आस्थापनांनी सुरु केलेल्या २९ निवारा केंद्रातून २ हजार नागरिकांची व्यवस्था केली असून तेथे त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच. नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी होत असल्याचेही ते म्हणाले. त्यांना मानसिक आधार दिला जात असल्याचेही ते म्हणाले.

शिर्डी, दि.07-संगमनेर तालुक्यातील 32 संशयीत व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी सामान्य रुग्णालय,अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. राष्ट्रीय विषाणु संस्था,पुणे येथून त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून या 32 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येऊन त्यांना अधिग्रहीत केलेल्या इस्तितळात ठेवण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार कंटेनमेंट प्लॅन लागू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून यासाठी संगमनेर येथे 13 पथके तर आश्वी बुद्रुक येथे 6 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

            लॉकडाऊन काळात संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच संगमनेर शहर व परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर यांनी प्रतिबंधाचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत जीवनावश्यक वस्तू पायी चालत जाऊन खरेदी कराव्यात, उपद्रवशील व्यक्तींमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन असे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, संगमनेर अमोल निकम यांनी केले आहे.

शिर्डी । ।राजकुमार गडकरी।।   कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात  आलेली  श्री हनुमान जयंती शिर्डी  परिसरात साध्या पद्धतीने व घराघरात श्री हनुमान चालीसा वाचून साजरी करण्यात आली,व कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना शक्ती मिळो, अशी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली, देशात  सर्वत्र कोराेनाने हाहाकार उडाला असून महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे सर्वत्र लॉक डाऊनआहे, शिर्डी व परिसरातही लॉक डाऊन मुळे सर्व बंद आहे, अशा काळात हनुमान जयंती आज  आल्याने येथे  दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात गर्दी करून व विविध कार्यक्रम घेऊन हनुमान जयंती साजरी न करता श्री साई सेवा समितीच्या वतीने रावसाहेब एखंडे,  रवी कापसे,यांनी करण्यात आलेल्या आवाहनानुसार सावळीविहीर येथे अनेकांनी आप आपल्या घरातच राहून श्री हनुमान चालीसाचे वाचन करत श्री हनुमान जयंती साजरी  केली, व श्री हनुमान चरणी ,कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळू दे ।अशी मनोमन प्रार्थना करण्यात आली,  तसेच सावळीविहीर येथील श्री हनुमान मंदिरात सौ बेबीताई सोनवणे, मनोज बिडवे, पत्रकार राजेंद्र गडकरी, सौ, वैशाली जपे ,यांनी लॉक डाऊन चे नियम व दक्षता पाळत मंदिरात पाळणा बांधून त्यात श्री हनुमानाची प्रतिमा ठेवून आज सूर्यदया च्या वेळेस हनुमान जन्मोत्सव प्रथा व परंपरेने परंतु गर्दी न करता मोजक्या दोन-तीन लोकांच्या उपस्थितीत साजरा केला, हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान मंदिरा ला आंब्याच्या पानाचे तोरण व पुष्पहार माळा लावण्यात आल्या होत्या, यावेळी कोणत्याही आकर्षक विद्युत रोषणाई व दरवर्षाप्रमाणे  मोठी सजावट करण्यात आली नव्हती, साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला, शिर्डीत श्री हनुमान जयंती निमित्त श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिरात  गर्दी न करता साध्या पद्धतीने  जन्मोत्सव साजरा करण्यात आला, दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम यावर्षी लॉक डाऊनमुळे करण्यात आले नाहीत,तसेच शिर्डी परिसरातील निमगाव ,निघोज, रुई ,कोहकी, पिंपळवाडी, नांदुर्खी अशा प्रत्येक गावात साध्या पद्धतीने श्री हनुमान जयंती यावर्षी साजरी करण्यात आली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी, प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील अंदाजपत्रकाची रात्र गणली जाणारी शबे बारात गुरुवारी रात्री साजरी होणार असून यावेळी ही रात्र सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी आपल्या घरात साजरी करावी . कबरस्थानात कोणीही जाऊ नये असे आवाहन जामा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना मोहम्मद ईमदादअली जियाई यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे .
शबे बारातच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता मौलाना ईमदादअली यांनी सांगितले की कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज आपला देश आणि संपूर्ण जग संकटात सापडले आहे . हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे आवश्यक आहे . शबे बारातच्या रात्री सर्व मुस्लिम बांधव कबरस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर चादर चढवून तेथे दुआ करतात .मात्र यावर्षी कोरोनामुळे कोणीही कब्रस्तानात किंवा मशिदीत जाऊ नये . मशिदीत होणारे प्रवचन, मिलाद पठण आणि कबरस्थानात जाण्याचे आणि तेथे होणारे सर्व उपक्रम यावर्षी स्थगित करण्यात आले असून सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी गुरुवारी शबे बारातच्या रात्री आपापल्या घरातच नमाज पठण, कुराण पठण, अल्लाहचे नामस्मरण करावे आणि घरातूनच आपल्या पूर्वजांसाठी दुआ करावी . कुणीही बाहेर निघू नये . अहले सुन्नत वल जमातच्या कोणत्याही मशिदीमध्ये शबे बारात ची नमाज होणार नाही. या निमित्ताने दरवर्षी होणारे कोणतेही उपक्रम या वर्षी होणार नाहीत . सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीती आणि काळजीचे वातावरण आहे . प्रशासन याकामी जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र राबत आहे . प्रशासनाला सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी सहकार्य करावे व स्वतःचाही बचाव होण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये . शबे बारातची सर्व प्रार्थना घरातच करावी . आपल्या घरातील मुलाबाळांना सुद्धा बाहेर पडू देऊ नये असे आवाहनही मौलाना ईमदादअली यांनी केले आहे .
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात प्रार्थना करून कोरोनापासून मुक्तीसाठी दुवा करावी . कुणीही बाहेर पडू नये .कब्रस्तानातील आपल्या पूर्वजांसाठी आपल्या घरातूनच दुआ करावी असे आवाहन जमेअतुल उलेमा ए हिंद चे जिल्हाध्यक्ष मौलाना मोहम्मद इर्शादुल्लाह कास्मी यांनीही केले आहे .त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि आपले राज्य, देश आणि जग कोरोनाच्या भीषण संकटात सापडले आहे . अशावेळी प्रत्येक नागरिकाने स्वतःचा बचाव करून शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे . प्रशासनाला सहकार्य करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे . तरी शबेबारातच्या रात्री कोणीही घराबाहेर न पडता घरात प्रार्थना करावी तसेच एका ठिकाणी फार लोकांनी एकत्र येऊ नये . सामाजिक अंतराचे भान ठेवून वैयक्तिकरित्या सर्वांनी आपली प्रार्थना करावी आणि परिस्थितीला सामोरे  जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे .
शहरातील सर्व मशीदींच्या मौलानांनी शबे बारातच्या रात्री मशिदीतून गर्दी होऊ देऊ नये . भाविकांना याबाबत योग्य असे मार्गदर्शन करून आपल्या घरात प्रार्थना करण्यासंदर्भात जागृती करावी असे आवाहन जामा मशिदीचे विश्वस्त शेख शकूर ताजमोहम्मद,डॉक्टर राज शेख, तन्वीर रजा,मदर्सा रहमत ए आलम चे विश्वस्त नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, उस्मानिया मशिदीचे विश्वस्त रज्जाकभाई पठाण, गफूर शाह,रफिक शाह,शेख खलील पिरमोहम्मद,मक्का मशीदीचे विश्वस्त नजीर मुलानी, निसार भाई कुरेशी, जलालुद्दीन पिरजादे, गौसिया मशिदीचे बाबूभाई मुस्तकीम कुरेशी,तसेच मुफ्ती अतहरहसन रिझवी,हाफिज अब्दुल हमीद, हाफिज मोहम्मद जोहरअली आदींनी केले आहे .

बुलढाणा - 8 एप्रिल
ज्ञानगंगा अभयारण्यातील वन व वन्यजीवांचे संरक्षण करणार्‍या अकोला वन्यजीव विभागाच्या वन कर्मचाऱ्यांनी आज बुधवारला ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमधून कोरोना विषाणु बाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेला आहे.या अभयारण्यात बिबट,अस्वल,तडस सारखे हिंस्र प्राणी आहेतच तर आता पट्टेदार वाघाने ही या अभयारण्याला आपले अधिवास बनवले आहे
त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर अधिक जवाबदारी वाढलेली आहे. सद्या उन्हाळ्याच्या काळात सर्व वन कर्मचाऱ्यांवर वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था करणे, सर्व पाणवठ्यांची देखरेख करणे, जंगलाला वणवा लागू नये यासाठी फायर लाईन मारणे, वणवा प्रतिबंध करण्याचे विविध कामे सोबतच या काळात वन्यजीवांच्या शिकारी होण्याची जास्त शक्यता असते तेव्हा त्याला प्रतिबंध करण्यासाठी दिवस रात्र गस्तीचे काम सुरु आहे.या कामांसोबतच सद्या कोरोनाचे संकट पाहता जंगलालगतच्या गावांमधून कोरोनाबाबत वन्यजीव विभागा मार्फ़त जनजागृती करण्यात येत आहे. एका वाहनावर लाऊडस्पीकर लावून त्या द्वारे गावातील प्रत्येक गल्लीतून फिरून लोकांना कोरोना बाबत जनजागृती करीत आहे व लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे, वनपाल गीते, वनरक्षक चव्हाण, गवई व सर्व वन मजूर यांनी आज देव्हारी व गोंधनखेड गावांमध्ये जावून जनजागृती केली व लोकांना जंगलात ना जाण्याचा सल्ला ही दिला.वन कर्मचारी व मजूराना मास्कचे वाटप करण्यात आले.

बुलडाणा - 7 एप्रिल
मोताळा तालुक्यातील परडा गावा जवळ सुरु असलेल्या जुगार अड्डयावर बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने आज मंगळवारी छापा मारून 8 जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. त्यांच्या कब्जातून रोख रकमेसह 6 दुचाकी, 6 मोबाईल असा एकूण 2 लाख 26 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.एकी कडे संपूर्ण देश कोरोनाच्या धासकीत असतांना या जुगाऱ्यांचे खेळ चालत होते.
        मोताळा तालुक्यात बोराखेडी ठाणे अंतर्गत येत असलेले परडा शिवारातील हॉटेल ग्रीनपार्कच्या मागील शेतात टिनशेडमध्ये पैशांच्या हारजीतवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या कैलास दत्तात्रय सरोदे (रा. बोराखेडी), गजानन गोविंदा पाटील (रा. तिघ्रा), विवेक उर्फ पिंटू पांडुरंग सुरडकर (रा. मोताळा), राजेश पांडुरंग कांडेलकर (रा. मोताळा), अनिल भाऊलाल जैन (रा. मोताळा), शिवाजी बाबाराव जोहरी (रा. कोथळी), निंबाजी राजाराम चहाकर (रा. बोराखेडी), भगवान सदाशिव जवरे (रा. परडा) या 8 जुगाऱ्यांना पोलिसांनी छापा मारून आज दुपारी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून नगदी 21 हजार शंभर रुपये, सहा मोबाईल किंमत 30 हजार 500 रुपये, सहा दुचाकी किंमत 1 लाख 75 हजार रुपये व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 26 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहेकाँ सुधाकर तारकसे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त 8 जुगाऱ्याविरुद्ध कलम 12 (अ) मु.जु.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ सुधाकर तारकसे, नापोकाँ विलास पवार, नापोकाँ मोहन डुकरे, पोकाँ सतीश राठोड यांनी केली. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ राजेश वानखेडे, पोकाँ शिवाजी मोरे करीत आहेत.

शिर्डी ।जितेश लोकचंदानी। ।।।निवासी संपादक।
      सध्या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊनलोड आहे, शिर्डीत सर्वत्र बंद आहे, अशा परिस्थितीत कोरोना चा संसर्ग होऊ नये किंवा या आजाराला बळी पडू नये म्हणून शिर्डीकर घराघरात बसून आहेत, अशा शिर्डी करांना मात्र नगरपंचायतकडून सध्या दूषित पाणीपुरवठा  होतआहे, आजच सकाळी नगरपंचायतीने केलेल्या पाणीपुरवठा मध्ये काही वार्डातील अनेक कुटुंबांना कचरा व आळ्या आल्याने या नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे, यापुढे असे होऊ नये अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे शिर्डी अध्यक्ष समीर वीर यांनी केली असून जर नगरपंचायतने यामध्ये त्वरित सुधारणा व दखल घेतली नाही व शुद्ध पाणीपुरवठा केला नाही तर नगरपंचायत समोर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला असून राहता तहसीलदार, पोलीस निरीक्षक शिर्डी व शिर्डी नगरपंचायतला त्यांनी तसे निवेदन पाठवले आहे,
      शिर्डी हे आंतराष्ट्रीय तीर्थस्थान आहे, येथे शिर्डी नगर पंचायतीने लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना यापूर्वीच राबवलेली आहे, शिर्डीकरांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे, असे असताना व सध्या कोरोना मुळे लोक कामधंदा,व सर्व काही सोडून घरात आहेत , कोरोना चे संकट मोठे आहे, मात्र अशा संकट समयी सुद्धा शिर्डी नगर पंचायतीने आरोग्याच्या दृष्टीने अधिक लक्ष देणे गरजेचे असताना येथे मात्र सध्या दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिका कडून नगरपंचायत विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे,
 आज पहाटे येथील काही वार्डात शिर्डी नगरपंचायत ने पाणीपुरवठा केला, मात्र नळाला आलेल्या या पिण्याच्या पाण्यामधून कचरा व आळ्या सुद्धा आल्या, पिण्यासाठी नागरिकांना हे अशुद्ध, दूषित पाणी विविध आजारांना  कारण ठरू शकते, सध्या देशात, राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे, अशात येथे  दूषित पाणी जर पिण्यासाठी नळाद्वारे घराघरात आले, व हे  पाणी पिण्यासाठी वापरले गेले, तर मोठी आरोग्याची समस्या येथे निर्माण होणार आहे, शिर्डी नगरपंचायत पाणीपुरवठा साठी लाखो रूपये खर्च करते, स्वच्छतेच्या बाबतीत  शिर्डीला देशात  तिसरे व राज्यात दुसरे बक्षीस मिळाले आहे,  असे असतानासुद्धा असा अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा नागरिकांना नळाद्वारे होत असेल व या दूषित पाण्यामुळे जर शिर्डीतील नागरिक विविध आजारांना बळी पडले तर कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांना ते मोठे धोकादायक व मोठे आपत्ती जनक परिस्थिती निर्माण करणारे ठरणार आहे ,याकडे शिर्डी नगरपंचायतने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे, सध्या लोक कामा धंदा विना घरात बसून आहेत, पैशाची अडचण आहे, खाण्यापिण्याची ही मोठी अडचण आहे, शिर्डीत अनेक लोक गरीब आहेत, कोरोनामुळे सर्व शिर्डी करांच्या आरोग्याची दक्षता, काळजी व खबरदारी घेण्याचे काम नगरपंचायतीचे असतानाही अशा अशावेळी ही येथील लोकांना असा दूषित पाणीपुरवठा केला गेला व ते आजारी पडले तर त्याला जबाबदार कोण ।।असा प्रश्न काही वॉर्डातून नगरपंचायतला विचारला जात असून शिर्डी नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी यांनी त्वरित याकडे लक्ष द्यावे, अन्यथा नगरपंचायत समोर परवापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल व याला जबाबदार शिर्डी नगरपंचायत राहील, असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे शिर्डी अध्यक्ष समीर वीर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे व त्यांनी हे निवेदन राहता तहसीलदार शिर्डी पोलीस स्टेशन व नगरपंचायत ला पाठवले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget