तालुक्यातील संवत्सर चौफुलीपासून रेल्वे पुलाच्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील संवत्सर चौफुलीपासून रेल्वे पुलाच्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्ती रस्त्यावरील वाहने अडवून लूट करीत असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे 1 च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, सहाजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. आरोपींकडून पोलिसांनी चाकू, सुरे, लोखंडी पाईप, स्टंप, कटावणीसह मोटार सायकल जप्त केली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे पुलावर पाच ते सहा व्यक्ती धारदार हत्याराची भीती दाखवत वाहनचालकांची लूट करीत असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याला मिळाली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत,पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड पोलीस वाहनाने संवत्सर चौफुलीकडून रेल्वे पुलाकडे निघाले असता येणार्या जाणार्या लाईटच्या उजेडात दोन मोटार सायकलवर पाच ते सहाजण मध्यरात्रीनंतर रस्त्यावर उभे राहुन वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुट करीत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्यांचे वाहन बाजुला लावून छुपा पाठलाग केला. त्यातील दोन आरोपी तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग (वय 24,रा.टिळकनगर), निलेश प्रदिप चव्हाण (वय 26, रा.भगवाचौक गांधीनगर, कोपरगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून चाकू, सुरे, लोखंडी पाईप, स्टंप, कटावणीसह,विना नंबरची हिरोहोंडा मोटार सायकल जप्त करण्यात आली केली.अन्य आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी अविनाश भगुरे व त्याचे दोन मित्र रा.कोपरगाव हेदेखील टोळीत असल्याची माहिती दिली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून यापूर्वीही या आरोपींना रस्ते लुट प्रकरणात अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कोपरगाव पोलीस ठाण्यात रस्ते लुटीचा गुन्हा आरोपींवर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर पुढील तपास करत आहेत.











