Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याच्या विरोधात स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे. परंतु मी ज्या खुर्चीवर आहे. त्याठिकाणाहून या कायद्याच्या विरोधात ठराव करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. माझी खुर्ची राजकारण करण्याची नाही, अशी भुमिका नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केली.नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐनवेळेच्या विषयात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध असल्याचे अंजुम शेख, मुजफ्फर शेख यांनी सांगितले. अन् पालिकेच्या सभागृहाने तसा ठराव घेण्याची मागणी त्यांनी केली. यादरम्यान या कायद्याचे समर्थन व विरोध करणार्‍या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी नगराध्यक्षा यांनी आपली भुमिका स्पष्ट केली यावेळी मुजफ्फर शेख म्हणाले की, एका जातीला टार्गेट करुन हा कायदा करण्यात आला आहे. मात्र, हा देश सर्वांचा आहे. कोणाच्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही. हा कायदा देशातील 130 कोटी लोकांना रांगेत उभा करणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहेत. आमचे पुरावे काढायला गेले, तर देशच आमच्या नावावर करावा लागेल, असे मुजफ्फर शेख म्हणाले.या कायद्याचा त्रास हिंदू समाजातील लोकांनाही होणार आहे. मात्र, मुस्लिमांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे. सरकारला या कायद्याच्या आडून आरक्षण संपवायचे आहे. आम्ही 600 वर्ष राज्य केले आहे, मेलो तरी आम्ही येथेच राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला काढण्याचा प्रश्न नसल्याचे ते म्हणाले.यावेळी अंजुम शेख यांनी पालिकेत काँग्रेसचे 22 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 6 असून त्यांची भुमिका या कायद्यास विरोध करण्याची आहे. त्यामुळे कोण हजर आहे, किंवा नाही याचे आम्हाला घेणेदेणे नाही. ज्यांना ठरावाचा विरोध करायचा त्यांना करू द्या, ज्यांना समर्थन द्यायचे ते देणार आहेत, असे ते म्हणाले.अंजुम शेख यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात जो ठराव मांडला त्या ठरावाला आमचा पाठिंबा असल्याचे नगरसेवक संजय फंड यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे नगसेवक रवी पाटील, किरण लुणिया, जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास आमचा पाठिंबा असल्याचे लेखीपत्र नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांना दिले. त्यानंतर प्रत्येकाने यावर आपली भूमिका मांडावी असे ठरले.यावेळी रवी पाटील म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. येथील मुस्लिमांना आमचा विरोध नाही, परंतु बाहेरून येणार्‍यांना विरोध आहे. फाळणी झाली तेव्हा 25 टक्के हिंदू पाकिस्तानामध्ये होते, आज ते एक ते दोन टक्केही राहिले नाहीत, मात्र त्यावेळी जेवढे मुस्लिम बांधव भारतात होते, ते कित्येक पटीने वाढले आहेत.याचा अर्थ येथे सर्वांना चांगल्या वातावरणात राहता येते, हे स्पष्ट होते. प्रत्येक देशात आपल्या देशातील नागरिकांची नोंद असते. आपल्याकडेही शिस्त लागली पाहिजे. त्यामुळे या कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे रवी पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाचे किरण लुणिया यांनी हा कायदा देशहिताचा आहे, त्यामुळे या कायद्यास आमचे पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले.यावेळी प्रत्येक नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडले. उपस्थित नगरसेवकांपैकी 19 नगरसेवकांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध दर्शविला तर सात नगरसेवकांनी समर्थन केले. शेवटी प्रत्येक नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय हा ठराव संमत होणार नाही, असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका : नगराध्यक्षा सी.ए.ए. व एन.आर.सी. विरोधात ठराव करण्याबाबत पत्र दिल्याने सभागृहात संभ्रामावस्था निर्माण झाली. हा विषय ऐनवेळच्या विषयात न घेता अजेंड्यावर घेऊन बहुमताच्या बाजूने ठराव होईल, माझी भुमिका स्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध करून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे.

बुलडाणा - 18 फेब्रूवारी
राज्यात गुटखाबंदी आहे, मात्र बाहेरील राज्यातून अवैधरित्या गुटखा आपल्या राज्यात आढळल्यास त्या विषयी तातडीने तक्रार करावी,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 या क्रमांकावर, 022-26592361 ते 65 किंवा comm.fda-mah@nic.in  या ई मेल पत्त्यावर तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
       डॉ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुटखा बंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी,असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या संदर्भात मोक्का सारखा कायदा लावता येईल का याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे गृह विभागाला सांगण्यात आले आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी इतर राज्यातून गुटख्याचा साठा, वाहतूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास सामान्य नागरिकांनीही सावध राहून यासंदर्भात आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
226 कोटी किंमतीचा गुटखा जप्त
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण सुमारे 226 कोटी 53 लाख किंमतीचा गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. 4782 प्रकरणी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषीं विरुद्ध राज्यातील विविध न्यायालयात एकूण 6206 खटले दाखल करण्यात आले आहे.

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधात्मक आदेश काढल्यानंतर इतर राज्यांनी देखील गुटखा या अन्न पदार्थांवर प्रतिबंध केलेला आहे. इतर राज्यांमध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी या अन्न पदार्थांच्या उत्पादन व विक्रीत बंदी नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातून चोरी/छुप्या मार्गाने हे अन्न पदार्थांची वाहतूक करुन विक्री केली जाते असे लक्षात आल्याने. गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक कायमची थांबावी म्हणून प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द / निलंबित करण्याबाबत प्रशासनाने शासनाच्या मान्यतेने परिपत्रक काढलेले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर नगरपालिका भुयारी गटार अपहार प्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे यांनी 29 माजी नगरसेवकांना समजपत्र बजावले आहे. त्यात काही विद्यमान व सत्ताधारी नगरसेवकांचाही समावेश आहे.श्रीरामपूर नगरपालिकेत केंद्र व राज्य सरकार यांच्या निधीतून भुयारी गटार योजना राबविण्यात आली. परंतु त्यामध्ये अपहार झाल्याची तक्रार मोरया फाउंडेशनचे केतन खोरे यांनी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावेळचे जिल्हा पोलीस प्रमुख इशु सिंधू यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली होती. आता या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे या करत आहेत.या प्रकरणाच्या तपासाबाबत चौकशी करण्यासाठी दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी तपासी अधिकारी डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांनी पालिकेतील सुमारे 29 आजी-माजी नगरसेवक व नगरसेविकांना समजपत्र पाठविले आहे. त्यांना दि. 20, 22 व 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगर येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलवले आहे.हे समजपत्र बाजावलेल्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये विद्यमान नगरसेवक भारती अनिल कांबळे, शेख अंजुम परवेज मुसा अहंमद, मुजफ्फर पापाभाई शेख, श्रीनिवास लक्ष्मीनारायण बिहाणी, राजेश अलघ, सुभाष विठ्ठल गांगड तर माजी नगसेवकांमध्ये सौ. सुधा संतोष कांबळे, आशिष विजय धनवटे, सौ. शेख निलोफर महंमद, रवींद्र गिरधारीलाल गुलाटी, राजश्री राजेंद्र सोनवणे, सुमैया मुनीर उर्फ मुन्ना पठाण, श्याम अर्जुन अढांगळे, जायदाबी कलीम कुरेशी, अण्णासाहेब रेवजी डावखर, राजन चुग, मंगल सुभाष तोरणे, कांचन दिलीप सानप, संगीता अरुण मंडलिक, व्यंकटरमन कैलास नारायण, शेख सायरा सलीम, राघेश्वरी सुनील मोरे, राजेंद्र नानासाहेब म्हांकाळे, मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे, निर्मला भाऊसाहेब मुळे, दत्तात्रय साबळे, कल्याण बुधमल कुंकूलोळ यांचा समावेश आहे. या 29 जणांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नगरसेविका रजियाबी शब्बीर जहागीरदार यांचे डिसेंबर 2018 मध्ये निधन झाले आहे.

बुलडाणा - 17 फेबरवारी
बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन हद्दीत अवैध वरली-मटका, जुगार , काही ढाब्यावर व खेड्या पाड्यात अवैध पणे दारु विक्री बिनबोभाट पणे सुरु असुन अनेक महीलांचे सुखी संसाराला ग्रहण लागले आहे. मी असे पर्यंत अवैध व्यवसाय चालु देणार नाही असे जाहीरपणे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले असतांना ही धामणगाव बढे ठाणे हद्दीत अवैध धंदे "जोमात" सुरु असून स्थानिक पोलिस प्रशासन "कोमात" दिसत आहे,हे अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी निवेदना द्वारे स्थानिकांनी केली आहे.
       
धामणगाव बढे पो.स्टे.अंतर्गत एकुण 52 गावांचा समावेश आहे तर पिंप्री गवळी पो.चौकी सह रोहीणखेड,को-हाळा बाजार,पि.देवी ,शेलगाव बाजार, धामणगाव बढे इतके बिट असुन सर्व ठिकाणी अवैध व्यवसायीकांचे जाळे पसरले आहे.अनेक ठिकाणी वरली-मटका जोमात आहे इतकेच नव्हे तर आंबट शौकिनांसाठी काही हॉटेल- ढाब्यावर अवैध दारु विक्री सुरु आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी मी असे पर्यंत अवैध व्यवसाय चालु देणार नाही असे जाहीर केल्या नंतर काही ठीकाणी अवैध धंदे बंदही झाले व पोलीसाने कारवाया ही केले परंतु जिल्ह्याचे पालकमंत्र्याचे अवैध धंदे बंदी आदेशाची पायमल्ली करुन स्थानिक पो.स्टे.सह परिसरात बिनबोभाट अवैध वरली मटका जुगार अवैध दारु विक्री होत असलेल्या ठिकाणी संबंधीता विरुध्द काय कार्यवाही होणार हा खरा प्रश्न आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी अवैध व्यवसाया विरुध्द उचललेल्या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागत होत असुन विषेश महीला वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
    धामणगाव बढे येथे मागील 5 जानेवारी रोजी अवैध वरली मटक्याच्या दुकानावर गावातील काही गाव पुढा-यांनी हल्लाबोल करीत वरली दुकान बंद केले या प्रसंगी स्थानिक पोलीस कर्मचा-याची ही उपस्थिती होती व गावात तणावाचे वातावरण निर्माण होवुन ही या विरुध्द कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई झाली नसल्याने या उलट वरली-मटका व्यवसायाला स्थानिक पोलीसांची मुक संमती मिळताच हा व्यवसाय प्रा.आ.केंद्र,शाळा, विद्यालय व मंदीर परिसरात सुरु करण्यात आले जे आजही सुरु आहे. धामणगाव बढे सह परिसरातील अवैध व्यवसाय कायम स्वरुपी बंद करण्या बाबत गांवक-यांच्या वतिने धामणगाव बढे पो.स्टे.कडे आज दी.17 फेब्रूवारी रोजी लेखी तक्रार अर्ज दीला असुन त्यावर प्रामुख्याने ग्रा.पं सदस्य गजानन घोंगडे,माजी सरपंच भागवत दराखे,ग्रा.पं.सदस्य जयदीप साखळीकर,मंगेश क्षिरसागर,रामशंकर सोनोने,सदानंद क्षिरसागर,माजी सरपंच तथा ग्रा.पं सदस्य अॕड युवराज घोंगडे सह एकुण 80 ते 90 गावक-यांच्या सह्या आहेत

सुपा (वार्ताहर).अहमदनगर पुणे महामार्गावर सुपा टोलनाक्यावर ड्युटीवर आसलेल्या पोलीस कर्मचार्‍याबरोबर फरार आरोपीची झटापट झाली असून आरोपी पळून गेले.पोलीस कर्मचारी प्रमोद मधुकर लहारे वय 29 नियुक्ती कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी रात्री काही आरोपींच्या शोधार्थ त्याच्या मोबाईल लोकेशनवरून गाड्यांची तपासणी करत असताना रात्री 10.25 वा. विना नंबरची नॅकसॉन कंपनीची राखाडी रंगाची चारचाकी गाडी पोलिसांनी थांबवली. त्यातील आरोपी विश्वजीत रमेश कासार रा. वाळकी, ता.नगर याच्या मोबाईल लोकेशनवरून टोलनाक्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने गाडी थांबवून बाहेर न येताच थोडी काच खाली करत आतुनच दमदाटी करत शिवीगाळ केली.त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पो. ना. शेख यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने गाडीच्या खाली न येताच ड्रायव्हर शीटवर बसून पोलीस कर्मचार्‍याच्या हातावर व तोंडावर मारहाण करून गाडी रिव्हस मारून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेला. कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून फिर्यादी लहारे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 353, 332, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विश्वजीत रमेश कासार याचा शोध घेतला जात आहे. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रांजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुलबर्गा (कर्नाटक) येथील चौघांना शनिवारी रात्री (दि. 15) नेवासा-शेवगाव रोडवरील नागापूर गावच्या शिवारात हत्यारासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. देवराज कृष्णप्पा खडमंची (वय- 45), मारूती शिवकुमार खडमंची (वय- 19), रवी आनंद खडमंची (वय- 19), नागराज देवराज खडमंची (वय- 19 सर्व रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, एकजण पसार झाला आहे. त्यांच्याकडून एक टीव्हीएस स्टार दुचाकी, एक स्टीलचा सत्तूर, एक सूरा, एक लोखंडी दांडके, पाच मोबाईल असा 22 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.गुलबर्गा (कर्नाटक) येथील सराईत गुन्हेगारांची टोळी दोन दुचाकीवरून शेवगाव-नेवासा रोडने नेवासा फाट्याच्या दिशेने दरोडा घालण्यासाठी जात आहे. शेवगाव-नेवासा रोडवरील नागापूर गावच्या कमानीजवळ वनीकरणात सापळा लावला तर ते मिळून येतील, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलीस हवालदार बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डीले, विशाल दळवी, रवी सोनटक्के, अण्णा पवार, संदीप चव्हाण, राहुल सोळुंके, शिवाजी ढाकणे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने शनिवारी रात्री शेवगाव-नेवासा रोडवर नागापूरच्या कमानीजवळ सापळा लावला. काही वेळातच शेवगावकडून नेवासा फाट्याच्या दिशेने दोन दुचाकी येताना पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी एकाचवेळी रस्तावर येत बॅटरीचा प्रकाश देऊन त्यांना घेराव घातला. यावेळी पोलिसांनी पुढे असलेल्या दुचाकीवरील दोघांना व मागे असलेल्या दुचाकीवरील दोघांना जेरबंद केले. तर एक जण दुचाकी घेऊन पसार झाला. पोलीस नाईक संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीक्कीतून शेतकर्‍याचे चार लाख चोरल्याची दिली कबुली 7 जानेवारी रोजी नेवासा बसस्थानकजवळ उभ्या असलेल्या दुचाकीच्या डीक्कीतून चार लाख रुपये चोरल्याची कबुली या चार भामट्यांनी दिली आहे. नेवासा येथील आसाराम नळघे यांना ऊस व कापूस विक्रीतून मिळालेले चार लाख रुपये त्यांनी स्वत:च्या व मुलाच्या खात्यावर टाकले होते. लोकांचे उसने घेतले पैसे देण्यासाठी नळघे यांनी 7 जानेवारीला मुलाच्या खात्यातून एक लाख पाच हजार रुपये व स्वत:च्या खात्यावरून तीन लाख दहा हजार रुपये काढले. चार लाख दुचाकीच्या डीक्कीत ठेवले तर, 15 हजार रुपये खिशात ठेवले. दुचाकी बसस्थानक परिसरात लावून जवळच असलेल्या कृषी केंद्र चालकाला 15 हजार रुपये देण्यासाठी गेले. काही वेळाने नळघे दुचाकीजवळ आले असता डीक्कीचे कुलूप तोडून चार लाख चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास सुरू केला होता. चार लाख चोरलेले चोरटे पुन्हा मोठा दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

देवळाली प्रवरा - १६ फेब्रुवारी २०१९
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बिबट्या चा वावर वाढला असून रात्री  बिबट्याच्या एक शेळी ठार झाली आहे.     आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे श्रीरामपूर रोड लगत सोसायटी डिझेल पंप मागे असलेल्या ढुस वस्ती येथील निवासस्थानी दि. १६ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला. परंतु कुत्र्यांच्या भुंकण्याने खेळाडू आप्पासाहेब ढुस व त्यांचे बंधू अरुण ढुस हे उठून बाहेर आलेने बिबट्याने मृत शेळी तशीच सोडून पळ काढला.
     ही शेळी पाच महिन्याची गाभन असल्याचे सांगून देवळाली सोसायटीच्या माजी संचालिका चांगुणाबाई ढुस व नंदा ढुस यांनी दुःख व्यक्त केले असून ढुस वस्ती व देवळाली परिसरातील शेतकरी वर्गामध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     वन विभागाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन ढुस वस्ती परिसरात पिंजरा लाऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा व रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget