नेवाशात दरोड्याच्या तयारीत असलेली परप्रांतीय टोळी,हत्यारासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश.

अहमदनगर (प्रतिनिधी)  नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुलबर्गा (कर्नाटक) येथील चौघांना शनिवारी रात्री (दि. 15) नेवासा-शेवगाव रोडवरील नागापूर गावच्या शिवारात हत्यारासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. देवराज कृष्णप्पा खडमंची (वय- 45), मारूती शिवकुमार खडमंची (वय- 19), रवी आनंद खडमंची (वय- 19), नागराज देवराज खडमंची (वय- 19 सर्व रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, एकजण पसार झाला आहे. त्यांच्याकडून एक टीव्हीएस स्टार दुचाकी, एक स्टीलचा सत्तूर, एक सूरा, एक लोखंडी दांडके, पाच मोबाईल असा 22 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.गुलबर्गा (कर्नाटक) येथील सराईत गुन्हेगारांची टोळी दोन दुचाकीवरून शेवगाव-नेवासा रोडने नेवासा फाट्याच्या दिशेने दरोडा घालण्यासाठी जात आहे. शेवगाव-नेवासा रोडवरील नागापूर गावच्या कमानीजवळ वनीकरणात सापळा लावला तर ते मिळून येतील, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलीस हवालदार बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डीले, विशाल दळवी, रवी सोनटक्के, अण्णा पवार, संदीप चव्हाण, राहुल सोळुंके, शिवाजी ढाकणे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने शनिवारी रात्री शेवगाव-नेवासा रोडवर नागापूरच्या कमानीजवळ सापळा लावला. काही वेळातच शेवगावकडून नेवासा फाट्याच्या दिशेने दोन दुचाकी येताना पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी एकाचवेळी रस्तावर येत बॅटरीचा प्रकाश देऊन त्यांना घेराव घातला. यावेळी पोलिसांनी पुढे असलेल्या दुचाकीवरील दोघांना व मागे असलेल्या दुचाकीवरील दोघांना जेरबंद केले. तर एक जण दुचाकी घेऊन पसार झाला. पोलीस नाईक संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीक्कीतून शेतकर्‍याचे चार लाख चोरल्याची दिली कबुली 7 जानेवारी रोजी नेवासा बसस्थानकजवळ उभ्या असलेल्या दुचाकीच्या डीक्कीतून चार लाख रुपये चोरल्याची कबुली या चार भामट्यांनी दिली आहे. नेवासा येथील आसाराम नळघे यांना ऊस व कापूस विक्रीतून मिळालेले चार लाख रुपये त्यांनी स्वत:च्या व मुलाच्या खात्यावर टाकले होते. लोकांचे उसने घेतले पैसे देण्यासाठी नळघे यांनी 7 जानेवारीला मुलाच्या खात्यातून एक लाख पाच हजार रुपये व स्वत:च्या खात्यावरून तीन लाख दहा हजार रुपये काढले. चार लाख दुचाकीच्या डीक्कीत ठेवले तर, 15 हजार रुपये खिशात ठेवले. दुचाकी बसस्थानक परिसरात लावून जवळच असलेल्या कृषी केंद्र चालकाला 15 हजार रुपये देण्यासाठी गेले. काही वेळाने नळघे दुचाकीजवळ आले असता डीक्कीचे कुलूप तोडून चार लाख चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास सुरू केला होता. चार लाख चोरलेले चोरटे पुन्हा मोठा दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget