बुलडाणा - 18 फेब्रूवारी
राज्यात गुटखाबंदी आहे, मात्र बाहेरील राज्यातून अवैधरित्या गुटखा आपल्या राज्यात आढळल्यास त्या विषयी तातडीने तक्रार करावी,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 या क्रमांकावर, 022-26592361 ते 65 किंवा comm.fda-mah@nic.in या ई मेल पत्त्यावर तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
डॉ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुटखा बंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी,असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या संदर्भात मोक्का सारखा कायदा लावता येईल का याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे गृह विभागाला सांगण्यात आले आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी इतर राज्यातून गुटख्याचा साठा, वाहतूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास सामान्य नागरिकांनीही सावध राहून यासंदर्भात आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
226 कोटी किंमतीचा गुटखा जप्त
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण सुमारे 226 कोटी 53 लाख किंमतीचा गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. 4782 प्रकरणी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषीं विरुद्ध राज्यातील विविध न्यायालयात एकूण 6206 खटले दाखल करण्यात आले आहे.
गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द
महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधात्मक आदेश काढल्यानंतर इतर राज्यांनी देखील गुटखा या अन्न पदार्थांवर प्रतिबंध केलेला आहे. इतर राज्यांमध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी या अन्न पदार्थांच्या उत्पादन व विक्रीत बंदी नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातून चोरी/छुप्या मार्गाने हे अन्न पदार्थांची वाहतूक करुन विक्री केली जाते असे लक्षात आल्याने. गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक कायमची थांबावी म्हणून प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द / निलंबित करण्याबाबत प्रशासनाने शासनाच्या मान्यतेने परिपत्रक काढलेले आहे.
Post a Comment