हरेगावमध्ये ६०१ घरकुल योजनेचा शुभारंभ; विकासाला नवी दिशा देण्याची डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही

श्रीरामपूर (प्रतिनिधी):  तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘घरकुल योजना’ अंतर्गत ६०१ घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप तसेच ११ लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.



या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, बांधकाम कामगार, महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करत, राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.


डॉ. विखे पाटील म्हणाले, या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाली. परंतु आता ते दिवस संपले. श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही, ही माझी ग्वाही आहे. त्यांनी पुढे सांगितले की, खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून, आता आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. पुढील सात ते आठ महिन्यांत या प्रश्नावरही निर्णय लागेल, असे ते म्हणाले.


डॉ. विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली. ते म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते. रात्री सातनंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात. परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही. गेल्या २५ वर्षांत सत्तेत राहिलेल्यांनी काय केले, हे आता जनतेने विचारले पाहिजे. ते म्हणाले,  विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. एमआयडीसीची अवस्था बघा  आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही. त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो. हे बदलायचे काम आपण करणार आहोत. ६ महिन्यांत शिवाजी महाराज पुतळा; पुढे आंबेडकर स्मारक

विखे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्षे लोक आंदोलने करत होते. पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लावला. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यांत सोडवणार आहोत. दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे. ते म्हणाले, ज्यांना ४० वर्षांत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही, ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार?


हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी देत आहे, असे जाहीर करताना त्यांनी दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागातील गटारी, रस्ते, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांना वेग देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.


त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटले, गटारीच्या पैशात टक्केवारी करणाऱ्यांना अजून मला ओळखत नाही. ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला, त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत. ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो, कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे,  असे त्यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांचे नाव न घेता टोला लगावला 


ते म्हणाले, श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला, तर मी तात्काळ उद्योग निर्माण करतो. बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच, आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो 


आपल्या भाषणाच्या शेवटी विखे पाटील म्हणाले, मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही. मला फक्त विकास करायचा आहे. या जमिनीवर तुम्ही घर बांधाल, तुमच्या मुलांचं भविष्य घडवाल  हेच माझं समाधान आहे. मला तुमच्याकडून काही नको, फक्त आशीर्वाद द्या. कारण गरिबांच्या प्रार्थनेत ती ताकद असते, जी मला पुन्हा उभं करते.


कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले, आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटांत संपला. वेळेचं महत्त्व ठेवू या. बोलणं कमी, काम जास्त असू द्या. या कार्यक्रमास  जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर मा. तालुकाध्यक्ष दिपक पटारे  तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे मा. सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन भागडे, भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे, ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के, विस्ताराधिकारी दिनकर ठाकरे  शरद त्रिभुवन,  ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने, सरपंच दिलीप त्रिभुवन, सरपंच जितेंद्र गोलवड, उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात डॉ. विखे पाटील यांनी ‘विकासासाठी संघर्ष’, ‘सामाजिक समतेचा आदर्श’ आणि ‘राजकारणापेक्षा कार्य’ या तीन मुद्यांवर ठाम भूमिका मांडली.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget