श्रीरामपूर आरटीओत कामकाज ठप्प – वाहन चालक, मालक त्रस्त!
श्रीरामपूर / प्रतिनिधी :श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्या काही दिवसांपासून कामकाज ठप्प झाल्याने वाहन चालक व मालक वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.जुने अधिकारी बदलून गेल्यानंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी काही काळ लागला. या काळात वाहन चालविण्याचे लायसन, वाहन हस्तांतरण (टी.ओ), वाहनावरील बोजा चढवणे-कमी करणे, वाहन पासिंग आदी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली. परिणामी अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.हातावर पोट असलेले वाहनचालक, काहीजण उसनवारी करून वाहने घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत तर त्यांचे स्वप्न धुळीस मिळते. विशेषतः वाहन परवाना मंजुरीला सहा सहा महिने लागल्याने, नोकरीच्या संधी गमावणारे तरुण मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर श्री. विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. अनंता जोशी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. संदीप निमसे यांनी स्वतः लक्ष घालून कामकाज सुरळीत करावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
Post a Comment