श्रीरामपूरच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांची केली मागणी
मतदारसंघासह राज्याच्या प्रश्नांचा घेतला आढावा
सलीमखान पठाण (प्रतिनिधी)श्रीरामपूर - सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाचे अधिवेशनामध्ये काल रात्री श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाद्वारे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतला आणि श्रीरामपूर सह राज्यातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचा जाहीर धिक्कार केला.
काल दिवसभर राज्यपालांचे अभिभाषणावर चर्चा सुरू होती.मात्र सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना फारशी बोलायची संधी दिली नाही.काँग्रेसच्या आमदारांना तर पार शेवटी संधी मिळाली.रात्री साडेसात वाजता आमदार ओगले बोलण्यास उभे राहिले. आपल्या सुमारे बारा मिनिटाच्या घणाघाती भाषणात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.
श्रीरामपूर सह राज्यामध्ये सध्या अतिक्रमणाचा प्रश्न गाजत आहे.सरकारने अतिक्रमण काढताना 08 मार्च 2019 चा जो जी आर आहे.त्यानुसार सर्वांना घरे देण्याचे जाहीर केलेले आहे. 2011 पूर्वीच्या लोकांना ते जिथे राहतात तिथेच घरे देण्याचा शासनादेश आहे.मात्र या आदेशाची पायमल्ली करत अत्यंत निर्दयीपणाने श्रीरामपूरात अतिक्रमणे काढण्यात आली. बाराशे दुकाने आणि 130 घरे जमीन दोस्त करण्यात आली.अनेक प्रपंच रस्त्यावर आले. त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा आता चिंता लागली आहे असे सांगून अतिक्रमण काढताना कोणतीही दयामया दाखवण्यात आली नाही.दोन महिन्यांची बाळंतीण आपल्या बाळाला घेऊन या अतिक्रमण काढणाऱ्या लोकांना आडवी आली तरी तिचे घर जमीन दोस्त करण्यात आले.सध्या हे कुटुंब रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे सांगून मानवता धर्म हा काही प्रकार आहे याची सरकारला जाणीव आहे का असा प्रश्न विचारून त्यांनी सरकारचा धिक्कार केला.
इतर मुद्द्याचा परामर्ष घेताना आमदार ओगले यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच मुंबईतील हिंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे काम का रखडले आहे ? ते कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारला.
एकात्मिक औद्योगिक केंद्र व माल वाहतूक केंद्र राज्यामध्ये निर्माण करण्याचे सरकारचे धोरण आहे. यामध्ये अनेक ठिकाणी औद्योगिक भूखंड पडीक आहेत.सदरचे केंद्र श्रीरामपूर येथे व्हावे.या ठिकाणी विमानतळ,चांगले रस्ते, रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एकात्मिक औद्योगिक केंद्र श्रीरामपूरला देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान राबवताना शेतकऱ्यांच्या कापसाला आठ हजार रुपये क्विंटल भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या उसाला चार हजार रुपये टन भाव द्यावा अशी मागणी केली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील निवड झालेल्या एक लाख युवकांना गेल्या सहा महिन्यापासून पगार मिळालेला नाही. तो त्यांना त्वरित मिळावा तसेच सदरचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा करण्यात यावा अशी ही मागणी त्यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी - शिंगणापूर हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान असून दोन्ही तीर्थस्थानांना जोडणारा नगर मनमाड रस्ता हा गेली अनेक वर्ष खराब झालेला आहे.हजारो माणसे त्या ठिकाणी मेलेली आहेत.तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना योग्य आदेश द्यावेत असे ते म्हणाले. सोयाबीन खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार शोधून काढण्याची मागणी देखील त्यांनी केली. अंगणवाडी सेविका निवड समितीचे अध्यक्ष पद आमदारांकडे होते. त्यात आता बदल करण्यात आला आहे. तसेच एस सी व ओबीसी चे गुण कमी केले आहे.त्यामुळे एससी आणि ओबीसी चे आरक्षण कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे का ? असा प्रश्न विचारून सदरचे प्रवर्ग आरक्षण नियमित करावे व तोपर्यंत ही भरती स्थगित करावी अशी मागणी त्यांनी केली.
2011 पूर्वीच्या कॉलेजेसना शंभर टक्के अनुदान द्यावे असेही ते म्हणाले.
मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये क्रीडा संकुले उभारण्यात यावी, त्यामध्ये श्रीरामपूरचा अग्रक्रमाने विचार करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत सरकार काही उपक्रम राबवीत आहे. परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली तसेच संविधानाचा अपमान करण्यात आला.या घटना करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली.
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील राहणारा मी असून त्या ठिकाणी बहादूरगड किल्ला आहे. या किल्ल्याशी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी निगडित आहेत.तरी सदरच्या किल्ल्या चा राष्ट्रीय स्मारकात समावेश करावा अशी ही मागणी त्यांनी केली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती.मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती सुद्धा त्वरित करावी असेही ते म्हणाले.
चौकट
सरकारच्या एकूणच कामकाज करण्याच्या पद्धतीवर आसूड ओढतांना आमदार हेमंत ओगले यांनी आपल्या भाषणात -
*बडी सफाई से झूट बोलते है कुछ लोग,उन्हे खबर भी नही हमे सब कुछ बखुबी मालूम है*
असा शेर सादर करून आपल्या भाषणाला सुरुवात केली.
*आमदारांचे अभिनंदन*
आमदारकीला निवडून आल्यानंतर हेमंत ओगले यांचे हे दुसरे अधिवेशन होते यापूर्वी नागपूर येथे अल्पकालीन अधिवेशन झाले होते.दोन्ही अधिवेशनात त्यांनी श्रीरामपूर मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न आवर्जून मांडले.यापूर्वी कधीही असं झालं नव्हतं.तालुक्याच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करून विधानमंडळात त्यावर आवाज उठविल्याबद्दल आमदार हेमंत ओगले यांचे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेने अभिनंदन केले आहे .
चौकट
*पुन्हा ती गांधी टोपी*
काल विधानसभेत आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आमदार ओगले यांनी श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे असे वाक्य लिहिलेली गांधी टोपी पुन्हा एकदा प्रधान केली होती. विधानसभेत प्रत्येक वेळी बोलताना ते या टोपीचा वापर करतात त्यामुळे श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नाला विधानसभेत चालना मिळते कालही आपले भाषण करताना त्यांनी ही टोपी परिधान केली होती. विधानसभेत तो एक चर्चेचा विषय होता.
Post a Comment