भगवान शिव हे संहारकर्ता आणि पुनरुत्थान करणारे देव असून, ते भक्तांच्या सर्व संकटांचे निवारण करतात. ते त्रिमूर्तींपैकी एक असून सृष्टीचा समतोल राखतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, असे मानले जाते. तसेच, या दिवशी भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते, असे अनेक धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. शिवभक्त या दिवशी उपवास करतात, जागरण करतात, मंत्रजप व अभिषेक करून भगवान शिवाची आराधना करतात.
भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून प्रगट झालेल्या अग्निनारायणाचाच अवतार म्हणजे अडबंगनाथ महाराज आहे. असा हा पवित्र अडबंगनाथ जन्मोत्सव व महाशिवरात्री उत्सवाची प्रथा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांनी घालून दिलेली आहे. त्यामुळे या दिवसाला गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने विशेष महत्व आहे.
अश्या या विशेष दिवशी अत्यंत उत्साहाने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांची सुरुवात बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता नाथांचा अभिषेक व होम हवन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता ज्या भावीकांचे धर्मनाथ बीज उत्सवासाठी अनमोल योगदान लाभलेले आहे अशा भाविकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे सत्संग प्रवचन होईल. तसेच दु.12 वाजता ओम चैतन्य अडबंगनाथ जन्मोत्सव साजरा होईल.
तद्नंतर खिचडी महाप्रसाद श्री.अर्जुन आप्पा लोखंडे पाथरे यांच्या वतीने होईल व संतपूजन श्री.बाळासाहेब वाकचौरे नाशिक यांच्या वतीने होईल.
या दिवशी हजारो भाविकांना अडबंगनाथांचे दर्शन घेण्याचा अभूत पूर्व योग प्राप्त होणार आहे.भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात हा सोहळा भाविकांसाठी अपूर्व आनंद देणारा ठरणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री अडबंगनाथ मंदिरात आध्यात्मिक लहरींनी भारलेले वातावरण अनुभवता येणार आहे. भव्य दिव्य असा महाशिवरात्री व अडबंगनाथ जन्मोत्सव आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी दिवसभर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अन्नक्षेत्र, गुरुकुल चालू आहे तरी आपणास कार्यक्रमासाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन श्री क्षेत्र अडबगनाथ देवस्थानचे महंत अरुणगीरीजी महाराज यांनी केले आहे
तसेच हजारो शिवभक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment