बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज ,श्रीरामपूर आणि स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संस्कार शिबिर सन 2024- 25 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरार्थी समोर मार्गदर्शन करताना ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना देविदास देसाई पुढे म्हणाले की श्रद्धा असावी. पण ती डोळस असावी. आज समाजात देवाधर्माच्या नावाखाली खुलेआम फसवणूक केली जात आहे. अंगात येणे हा एक मानसिक आजार असून अशा आजारी व्यक्तींना त्वरित मानसोपचार तज्ञाकडे नेणे आवश्यक आहे. भूत, भानामती, करणी करण्याच्या नावाखाली आज मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. यातून समाजाची फार मोठी हानी होते. कुणालाही जादूटोणा तंत्र मंत्र करता येत नाही. असे जर असते तर आपण आपल्या देशाच्या सीमेवरील सैन्य हटवून हे तंत्र मंत्र करणारे बुवा बाबा यांनाच सीमेवर बसवून मंत्र मारून समोरील शत्रूसैनिक मारण्यास सांगितले असते. परंतु तसे काही होत नाही. त्यामुळे कुणीही तंत्र मंत्र विद्या वशीकरण यास घाबरून जाऊ नये. आपल्या साधूसंतांनी देखील अंधश्रद्धेवर कडाडून टीका केलेली आहे. सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी नवसे करणे कन्यारत्न होती, तरी का करणे लागे पती असे सांगितलेले असतानाही आजही मुलं होण्याकरता नवस केले जातात हे दुर्दैव आहे. आज गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळी दिल्याच्याही घटना घडत आहेत. माणूस मंगळ ग्रहावर वस्ती करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुप्तधनाच्या लालसे पोटी लहान बालकांचे बळी दिले जात आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. माता पित्याची जिवंतपणीच सेवा करा. भविष्य हे थोतांड असून त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या मनगटावर विश्वास ठेवून काम करा यश आपोआपच मिळेल. भविष्य म्हणजे ठराविक ठोकताळे असतात असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना पकडलेल्या भोंदू बाबाचे अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनीही त्यास टाळ्याच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. जलाल पटेल यांनी करून दिला. अध्यक्षिय मनोगत डॉ. योगिता रांधवणे यांनी व्यक्त केले. त्यातून त्यांनी अंधश्रद्धेच्या विचारापासून सर्वांना दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबासाहेब तोंडे, प्रा. डॉ. किरण थोरात, प्रा. कीर्ती अमोलिक, डॉ. चेतना जाधव, प्रा. वैशाली वाघ, प्रा. समीना शेख, प्रा. प्रतिभा गाडे आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. शेवटी प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले
Post a Comment