बेलापुर (प्रतिनिधी )-भंगारवाल्याकडून खरेदी केलेल्या संशयास्पद तांब्याच्या तारा पुणे येथे घेऊन जाणारी दोन वाहने श्रीरामपूर पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोड करून सोडून दिल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना सुनील मुथा यांनी सांगितले की रविवारी रात्री श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजस्थान व श्रीरामपूर पासिंगच्या दोन वाहनातून संशयास्पद तांब्याचा तारा पुणे येथे घेऊन जात असल्याची खबर श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याला मिळाली. त्याने काही कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन सदरची वाहने बेलापूर येथील नगर बायपासला पाठलाग करून पकडली. चालकांची कसून चौकशी केली असता ते दिल्लीचे रहिवासी असून सध्या श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मध्ये राहत असल्याचे समजले तसेच त्यांच्याकडे सदर मालाची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. ही चौकशी चालू असतानाच श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मधून काहीजण बेलापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यातील तीन जणांनी पोलिसांशी घासाघीस करून काही लाखांची यशस्वी तडजोड केली. त्यानंतर रात्री दीड वाजता कोणतीही नोंद न घेता दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. सदर वाहने पकडून पोलीस स्टेशनला आणल्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झाले आहे. अशा तऱ्हेने रक्षकच चोरभामट्यांचे हितचिंतक बनत असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून आर्थिक तडजोड करणारा अधिकारी, त्याचा रायटर, सदर प्रकरणातील इतर कर्मचारी कोण होतेयाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
Post a Comment