उर्दू शाळा क्रमांक पाच चे कार्य अनुकरणीय - जहागीरदार,शाळेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  एखाद्या खाजगी शाळेत असणाऱ्या सर्व सुविधा नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत.शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. या शाळेच्या कार्याचे इतर शाळांनी अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळांनी शाळा क्रमांक पाचचा आदर्श घेऊन काम करावे.

शाळेचे पालक म्हणून या शाळेच्या प्रगतीचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन संविधान बचाव समितीचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी केले.

पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाचचा ३७ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री जहागीरदार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण,सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा, जलीलभाई काझी, हाजी युसूफभाई, विजय शेलार,आयाज तांबोळी, सरवरअली सय्यद मास्टर,सलाउद्दीन शेख, पंचायत समितीचे साधन व्यक्ती शाहीन शेख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, उपाध्यक्ष अजीम शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन,शिक्षक सचिन शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शबाना राजमोहम्मद शेख, नगरसेवक कलीमभाई कुरेशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा यांनी शाळा क्रमांक पाच ने उत्तम प्रगती केली असून या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत.ही नगरपालिका विभागातील जिल्ह्यातील एक प्रमुख आदर्श शाळा आहे. शाळेचे सर्व शिक्षक हे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.मुलांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.शैक्षणिक दर्जा देखील उत्तम आहे.हीच कामगिरी पुढील काळातही कायम राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेवा दलाचे मास्टर सरवरअली सय्यद यांनी माझ्या कुटुंबातील सर्व मुले या शाळेत शिकली आहेत.येथील शिक्षक अतिशय कष्टाळू आहेत याचा मला अभिमान वाटतो.पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन येथे केले जाते तसेच मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते त्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाला धन्यवाद दिले.

काँग्रेस नेते विजय शेलार यांनी आपल्या भाषणातून नगरपालिकेची जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून या शाळेचा सर्व श्रीरामपूरकरांना अभिमान आहे. समाजातील गोरगरीब मुलांचे जीवन घडविण्याचे कार्य खऱ्या अर्थाने या शाळेत सुरू आहे असे सांगून शाळेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन यांनी नगर जिल्ह्यातील नगरपालिका विभागातील सर्वात मोठी शाळा आणि सर्व सोयी सुविधा असणारी शाळा म्हणून शाळा क्रमांक पाचचा जिल्हाभरामध्ये उल्लेख केला जातो. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कार्य मोलाचे आहे असे सांगून प्रशासन अधिकारी राजेश डामसे यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी १ जुलै १९८७ साली शाळा अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत सव्वाचार हजार विद्यार्थी या शाळेत शिकून गेले आहेत.शाळेमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असून प्रत्येक वर्गात आता डिजिटल पॅनल बोर्ड खासदार निधीतून उपलब्ध झाले आहेत.शाळेची सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा,विज्ञान प्रयोगशाळा,खेळाचे भरपूर साहित्य या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्याचे कार्य आमचा शिक्षक वर्ग करीत आहे. या कार्याला पालकांची देखील चांगली साथ मिळते.पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांचे विशेष सहकार्य आम्हाला मिळत असते.या शाळेचे विद्यार्थी आज समाजामध्ये उत्तम प्रकारे आपले सेवा कार्य करीत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले.

हाजी युसुफ शेख यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांचा तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे वर्धापन दिनानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचे इमारतीवर तसेच प्रत्येक वर्गात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका वहिदा सय्यद,नसरीन इनामदार,शाहीन शेख, अल्ताफ शाह,अस्मा पटेल,निलोफर शेख, बशिरा पठाण,मिनाज शेख,एजाज चौधरी, रिजवाना कुरेशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ शहा यांनी केले तर आभार एजाज चौधरी यांनी मानले.

                    *चौकट*

उर्दू शाळा क्रमांक पाच चे विद्यमान मुख्याध्यापक सलीमखान पठाण हे या महिना अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या काळामध्ये शाळेची मोठी भरभराट झाली.भविष्य काळात त्यांच्या नंतरही शाळेच्या प्रगतीची ही वाटचाल अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी शाळेचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरी करणारी जिल्ह्यातील उर्दू शाळा क्रमांक पाच ही एकमेव शाळा आहे.यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो.याबद्दल पालकांनी शाळेच्या शिक्षक वर्गाचे विशेष अभिनंदन केले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget