या बाबत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने माहीती देताना नवले साळवी व खंडागळे यांनी सांगितले की बेलापूर येथे बाजारतळ, स्मशानभूमी, केशव गोविंद मंदिर व महादेव मंदिर परिसरातून वाहणार्या छोट्या ओढ्यांमधून सांडपाणी व इतर मलमुत्र प्रवरा नदीत जाते. त्यामुळे प्रवरा नदी अशुध्द व दूषित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नद्या शुध्दीकरण महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्यात बेलापूरची प्रवरा नदी स्वच्छ करण्यासाठी १ कोटी १८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये ऐनतपूरसाठी सुमारे ५९ लाख रुपये, तर बेलापूरसाठी ५९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येकी नऊ कंपोस्ट टँक, टायगर बायोफिल्टर प्लॅन्ट उभारला जाणार आहे. यामधून नदीला जाणारे अशुध्द पाणी शुध्द केले जाणार असून या पाण्याचा वापर शेती किंवा झाडांसाठी करता येणार आहे.
दरम्यान दोन्हीही प्लान्टसाठी जागा निश्चित करण्याचे काम अद्याप सुरु आहे. ग्रामपंचायतीने ऐनतपूर प्लान्टसाठी स्मशानभूमिजवळ, तर बेलापूरच्या प्लान्टसाठी बाजारतळाजवळ जागा सुचविली आहे. ऐनतपूरसाठी मंजूर झालेला प्लॅन्ट सप्टेंबर अखेर तर बेलापूरचा ऑक्टोबर अखेर पूर्ण करावयाचा आहे.
बेलापूरच्या चार भागातून नदीपात्रात सांडपाणी जाते. या दोन्ही प्रकल्पांतर्गत स्मशानभूमी व बाजारतळ परिसरातून नदी पात्रात सोडले जाणारे पाणी अडवून शुध्द केले जाणार आहे. मात्र केशव गोविंद व महादेव मंदिराच्या भागातून जाणारे पाणी दुसर्या टप्प्यात एकत्रित करुन शुध्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या दोन प्रकल्पांतर्गत किमान ६० टक्के पाणी शुध्द होणार असल्याचे माजी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले
Post a Comment