श्रीरामपूरात दोन गटात हाणामारी,शांतता बिघडवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राज्यातील वातावरण खराब करायचा प्रयत्न काही प्रतिगामी शक्ती करीत आहेत. अकोला, शेवगाव येथे हे प्रयोग झालेले आहेत. श्रीरामपूर सुद्धा अशा पद्धतीने अशांत करून श्रीरामपूरची शांतता धोक्यात आणून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा डाव वेळोवेळी आखला जात असतो.यातूनच काल हजरत काजीबाबा उर्सानिमित्ताने निघालेल्या चादरीवर गोंधवणी गावांमध्ये दगडफेक करून वातावरण खराब करायचा प्रयत्न काही समाजकंटक यांनी केला. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली व शहराच्या शांततेला गालबोट लावण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हाणून पाडला.एवढेच नव्हे तर ज्या दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली होती ती त्यांना तातडीने उघडायला लावली तसेच काजी बाबांच्या कव्वालीच्या कार्यक्रमात कोणताही खंड न पडू देता सुरळीतपणे रात्री बारा वाजेपर्यंत ती पार पडली. त्यामुळे ज्या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असतात तिथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाते याचा प्रत्येक काल श्रीरामपूरकरांना आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम या स्वतः हेल्मेट लावून बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्या आणि शहराचं वातावरण खराब करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड केला. त्याबद्दल सर्व शहरवासीय त्यांना धन्यवाद देत आहेत.

दंगलीसाठी बऱ्याचदा शुल्लक कारणे देखील पुरेशी असतात. हजरत काजीबाबा म्हणजे श्रीरामपूरचे जिवंत प्रतीक होते. त्यांचा उरूस अतिशय भक्तिभावाने दरवर्षी साजरा केला जातो. पन्नास वर्षाची परंपरा या उरुसाला आहे. काजी बाबा उर्सानिमित्त होणाऱ्या कव्वाल्या या महाराष्ट्रभर गाजत असतात. काजीबाबांचा भक्त परिवार शहरात सर्वत्र असल्यामुळे विविध भागातून ऊर्सा निमित्ताने चादरी दर्ग्यावर येतात. अशीच एक चादर काल गोंधवणी गावातून येत असताना गोंधवणी रोड वरील गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी वाद घालून त्या ठिकाणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. गोंधवणी रोडची ही गुंड टोळी पोलीस रेकॉर्डवर सुद्धा आहे.त्यांच्या गुंडगिरीने संपूर्ण परिसर, तेथील महिला भगिनी, तरुण मुली वैतागलेल्या आहेत. अशा या गुंड प्रवृत्तींनी काल चादरीचे निमित्त करून शहरात अशांतता निर्माण करण्याचा व दंगल सदृश्य परिस्थिती तयार केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून चादर काढणाऱ्या तरुणांनी सुद्धा माणसं गोळा करायचा प्रयत्न केला होता.हे प्रकरण जर वाढले असते तर श्रीरामपूरची शांतता काल बिघडली असती. परंतु सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळल्याने राज्यात होणारी संभाव्य एक दंगल टळली असे म्हणता येईल.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत. परराज्यातील माणसे बोलावून प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. श्रीरामपूरला शांततेची वेगळी परंपरा आहे. सर्व जाती-धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने येथे नांदतात. निवडणूक जवळ आली की काही लोकांच्या अंगात येते. कधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तर कधी अन्य कारणावरून लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु शहरातील जनता अत्यंत सुज्ञ असल्यामुळे ती या माथेफिरूंच्या अशा प्रयत्नांना बळी पडत नाही. परंतु दरवेळी अशा पद्धतीने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीतरी कारण शोधून खोटे-नाटे प्रयत्न करून शहराची शांतता व सुव्यवस्था वेठीस धरली जाते.अशा गुंड प्रवृत्तींचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. सध्या श्रीरामपुरात गुंडांना महत्त्व आले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुंड उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना सत्ताधारी राजकीय पक्षाचे काही लोक मदत करीत असल्याची खुली चर्चा शहरामध्ये आहे. नगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हिंदू - मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण करून,मते मिळवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन लोकांची माथी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र खरोखरच श्रीरामपूरकरांना धन्यवाद दिले पाहिजे कि ते अत्यंत समजूतदारपणे या लोकांच्या या प्रयत्नांना बळी पडत नाही. तरी सुद्धा भविष्य काळामध्ये श्रीरामपूरची शांतता अबाधित राखण्यासाठी दोन्ही बाजूला असणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा बिमोड करून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. शहरांमध्ये काही ठराविक गट असे निर्माण झाले आहेत कि ते राजरोसपणे दोन नंबरचे धंदे उजळ माथ्याने करीत आहेत. वाळू सम्राटांचे आता धाबे दणाणले आहेत. मटका जोरात आहे. हप्ते वसुली जोरात आहे.

पोलीस खात्याचे काही कर्मचारी या गुंडांचे हस्तक म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे गुंडांचे मनोबल वाढले आहे. सर्वसामान्य जनता मात्र त्यामुळे त्रासलेली आहे. सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी गोळा करून अनेक कार्यक्रम मागील दोन महिन्यात शहरात झालेले आहेत. थोडसं जरी कुठे खट्ट वाजलं तरी बाजारपेठेतील व्यापारी भीतीने आपली दुकाने बंद करतात.ही भीती दूर करण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबाबत जागरूक होऊन लक्ष घालणे गरजेचे आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना श्रीरामपूरची सर्व परिस्थिती माहिती आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग शहर व तालुक्यामध्ये आहे. सर्व समाजामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी देखील श्रीरामपूरची शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक स्वरूपामध्ये श्रीरामपूर शहरांमध्ये शांतता कमिटीची बैठक पालकमंत्र्यांचे उपस्थितीमध्ये होण्याची आवश्यकता आहे.

गुंड प्रवृत्तीचे लोक सर्वत्र असतात. दोन्ही बाजूने अशा गुंड लोकांचा बंदोबस्त होऊन शहरातील नागरिकांना शांततेत जीवन कसे जगता येईल, येणाऱ्या काळातील निवडणुकांना कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget