श्रीरामपूर (प्रतिनिधी) -पैसे कमवायला फक्त ५ वी पर्यंत शिक्षण गरजेचे आहे हे एका उद्योजकाचे विधान आज प्रत्यक्षात पाहण्याची संधी परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजीटल उर्दू शाळा क्र.५ ने आयोजित आपना बाजार मध्ये प्राप्त झाली.एखाद्या खाद्य महोत्सवाला लाजवेल एवढे खाद्य पदार्थ या बाज़ारातील खाऊ गल्लीत पाहण्यास मिळाले.मुलांनी स्वछतेबाबत घेतलेली काळजी ही पंचतारांकित हॉटेलच्या शेफ प्रमाणे होती.प्रत्येक स्टॉलवर लेबलप्रमाणे ठेवलेले खाद्यपदार्थ व एका दिवसासाठी व्यासायिक झालेली ही लहान मुले, त्यांचा उत्साह व आनंद पाहण्यासारखा होता. त्यातून पालकांनी व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम दिसून येत होते. खरं तर या संपूर्ण उपक्रमाचे श्रेय हे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक सलिमखान पठाण सर यांना जाते. त्यांनी आपल्या काळात नगरपालिका शाळेचे रूपांतर एका कॉन्वेंट शाळेत केले असे म्हणण्यास हरकत नाही.आगामी काही दिवसात ते निवृत्त होणार असले तरी उर्दू शाळा क्रमांक पाचची निर्माण झालेली प्रतिमा येथील शिक्षक पुढे कायम ठेवतील याची मला खात्री आहे. विद्यार्थी हिताचे असेच उपक्रम या शाळेने राबवावेत.आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रमाकरीता उर्दू शाळा क्र ५ ला खुप साऱ्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो असे प्रतिपादन गरीबनवाज फाउंडेशनचे संस्थापक,माजी नगरसेवक मुख्तारभाई शाह यांनी केले.
येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आयोजित केलेल्या अपना बाजारच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अनोख्या अशा या अपना बाजारचे उद्घाटन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्तार शाह बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका जायदाबी कुरेशी,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख,उपाध्यक्ष अजीम शेख, युवक काँग्रेसचे जाफर शहा, सरवर अली मास्टर, मुक्तार मणियार,अहमद शाह, शरीफ मेमन,आदिल मखदुमी, फिरोज पोपटिया,असलम बिनसाद,फारुख तांबोळी,मुख्याध्यापिका परविन शेख,कांचन मुसळे,नाझिया शेख,नाहीद शेख आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी शाळा क्रमांक पाच मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात. दैनंदिन जीवनामध्ये मुलांना व्यवहार न्याय मिळण्यासाठी आयोजित केलेला आजचा हा आपला बाजारचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.यातून मुलांना जीवनासाठी आवश्यक व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होईल.अशा उपक्रमांची आज गरज आहे.या कार्यक्रमासाठी सर्वपक्षी लोक राजकीय अधिनिवेश बाजूला ठेवून शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देऊन देण्यासाठी एकत्र आले ही अभिनंदनीय बाब आहे असे नमूद करून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रास्ताविक भाषणामध्ये मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी दरवर्षी शाळेमध्ये अशा प्रकारच्या बाजाराचे आयोजन केले जाते. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी पालक आणि विद्यार्थी यांच्या आग्रहास्तव हा अपना बाजार भरविण्यात आला आहे. पालक व विद्यार्थी यांच्यात खूपच उत्साह आहे. त्यातूनच मोठ्या संख्येने स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत असे सांगितले.
या अपना बाजार मध्ये स्टेशनरी,भाजीपाला, खेळणी, कटलरी, किराणा आदी सामानाची दुकाने लावण्यात आली होती. सर्वात जास्त लक्ष वेधले ते खाऊ गल्ली विभागातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी. विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. पालक आणि परिसरातील नागरिकांनी या बाजारामध्ये मोठी गर्दी केल्याने चार तासांमध्ये अपेक्षित असणारा हा अपना बाजार दोन तासातच संपला. नगरपालिका शाळा क्रमांक चार,सहा, नऊ तसेच खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी या बाजाराला भेट दिली.
बाजारामध्ये ३२ हजार रुपयांची उलाढाल झाली.हैदराबादी बिर्याणी या स्टॉलला तोटा सहन करावा लागला. इतर स्टॉल मात्र नफ्यात राहिले.
एक आगळावेगळा उपक्रम म्हणून या अपना बाजारची चर्चा शाळेचे विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांमध्ये होती. आलेल्या सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली तसेच खरेदी सुद्धा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मृत्यूचा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे व शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री फारूक शाह, आसिफ मुर्तुजा,एजाज चौधरी,जुनेद काकर, वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल,बशीरा पठाण, निलोफर शेख, मिनाज शेख, यास्मिन पठाण, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद,हिना पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment