नाशिक प्रतिनिधी-महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वरिष्ठ गटाच्या 49 व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यांतून 252 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणारे खेळाडू अजिंक्य वैद्य, श्रद्धा चोपडे, अपूर्वा पाटील, समीक्षा शेलार, आदित्य धोपवकर, प्रदीप गायकवाड, शुभांगी राऊत यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध वजनी गटाच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांना सुरुवात झाली.यामध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटात पुण्याच्या गौतमी कांचनने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या रुध्वी श्रुंगारपुरेचा पराभव करून विजेतेपद मिळवले, तर भूमी कोरडे (मुंबई) आणि तन्वी पवार (सिंधुदुर्ग) यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला. पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात नागपूरच्या साईप्रसाद काळेने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात यवतमाळच्या अभिषेक दुधेचा पराभव करून या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तर मुंबईच्या राहुल बोभडी आणि ठाण्याच्या आदर्श शेट्टीला संयुक्त तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून 16 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान लखनौ येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे संचालक म्हणून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील 20 पंच कार्यरत आहेत. तर आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शेट्टी, शिल्पा शेरिगर या मॅटप्रमुख म्हणून काम बघत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा आयोजन समितीचे योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैंद, माधव भट आदी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment