अहमदनगर प्रतिनिधी-प्रार्थना सुरू असताना मोठ्या आवाजात गाणे लावू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी तलवार दाखवून धमकावत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील लालटाकी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.उबेद सलीम सय्यद (रा. मिसगर कॉलनी, लालटाकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शग्या ऊर्फ विशाल खंडागळे याच्यासह एका अल्पवयीन मुलाविरूध्द आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडागळे याला अटक केली आहे. फिर्यादी सय्यद हे त्यांच्या सहकार्यांसोबत धार्मिकस्थळी प्रार्थना करत असताना आरोपी बाजूला असलेल्या मिसगर कब्रस्तानमध्ये मोबाईलद्वारे ब्लू टूथ स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवत होते. यावेळी सय्यद व त्यांच्या सहकार्यांनी तुम्ही मोठ्याने गाणे वाजवू नका, प्रार्थना चालू आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी तलवार दाखवून शिवीगाळ केली. दमदाटी करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार दत्तात्रय जपे, शकील सय्यद, भास्कर गायकवाड, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, शिरीष तरटे, गौतम सातपुते आदींच्या पथकाने लालटाकी, सिद्धार्थनगर परिसरात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हत्यारही जप्त करण्यात आले आहे.

Post a Comment