अहमदनगर प्रतिनिधी-सण- उत्सव काळात सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल करून अफवा पसरविल्या जात असल्याचे समोर आले आहे. आगामी काळात जिल्ह्यामध्ये विविध सण उत्सव साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये काही चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले. सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी सायबर सेलची दोन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात अयोजित पत्र परिषदेत अधीक्षक पाटील बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. अधीक्षक पाटील म्हणाले की, जिल्ह्यात येत्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी, महावीर जयंती आदी विविध सण- उत्सव साजरे होत आहेत. काही दिवसांपूर्वी नेवासा येथे घडलेल्या घटनेसंदर्भात आरोपींना अटक करण्यात आली आहे.मात्र, सध्या सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलची दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. असे प्रकार आढळल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.जिल्ह्यात सामाजिक शांतता राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. रामनवमी उत्सवादरम्यान धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असून, गुंडांविरोधातही कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर शहरात जातीय तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, यासंदर्भातही पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी कुठलेही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नयेत. चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणे, त्याला लाईक करणे, कमेंट करणार्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. समाजकंटकांनी एकत्र येवून तेढ निर्माण होणारे व्हिडिओ तयार केले तर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. समाजात काही अफवा निर्माण झाल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेऊ नये.
Post a Comment