श्रीरामपूर प्रतिनिधी-तालुक्यातील उक्कलगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी मध्यरात्री येथील प्रगतशिल शेतकरी आबासाहेब सोन्याबापू थोरात यांच्या पटेलवाडी जवळील वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून त्यांच्या दोन शेळ्या व एका गिर जातीच्या कालवडीला ठार केले.दरम्यान ही घटना ताजी असतानाच परवा पुन्हा बिबट्याने सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान याच वस्तीवर हल्ला चढवून आबासाहेब सोन्याबापू थोरात यांचा नातू शुभम संदीप थोरात यास चावा घेऊन जखमी केले. मात्र शेतातील महिलांचा आरडाओरडा व प्रसंगावधान राखत शुभमने सावध पवित्रा घेतल्याने तो बालंबाल बचावला.त्याच्यावर शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी वनक्षेत्रपाल यांनी दोन दिवसांपूर्वी भेट देऊन मृत शेळ्या व वासरांचा पंचनामा केला असला तरी मुलावर हल्ला झाल्यानंतर मात्र वनखात्याचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही.जखमी शुभमला ताबडतोब लस देणे आवश्यक असताना स्थानिक पातळीवर कुठेही लस उपलब्ध झाली नसल्याचे समजते. या भागात द्राक्ष बागा आणि उसाचे मोठे आगार असून बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्यातच ऊसतोड होत असल्याने बिबटे मानवी वस्तीकडे कूच करत आहेत. हे बिबटे संख्येने तीन पेक्षा अधिक असून त्यांचा सातत्याने याच भागात वावर असल्याने या भागात त्वरित पिंजरा लावून हे बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

Post a Comment