संगमनेर प्रतिनिधी-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेरात गुरुवारी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीला काही तरुणांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला.मिरवणूक मेनरोडवर येताच एका समाजाचे काही तरुण हिरवे व लाल झेंडे घेवून मिरवणुकीत घुसले. या तरुणांनी घोषणाबाजी करत दुसर्या समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या. तसेच काहींना धक्काबुक्की करत महिलांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 100 ते 120 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मेनरोड येथे आली असता एका समाजाच्या काही तरुणांनी हातात हिरवे व लाल झेंडे घेवून मिरवणुकीत प्रवेश करत घोषणाबाजी केली. यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला. घोषणाबाजी करत असतांना मिरवणुकीतील काही महिलांना या तरुणांनी अपमानास्पद वागणूक दिली. तसेच धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने मिरवणुकीतील रथासमोर विक्षीप्त हावभाव करत रथ अडविण्याचा प्रयत्न केला. व पुतळ्याची हेळसांड करुन धार्मिक भावना दुखावल्या. फिर्यादी व साक्षीदार यांच्या जातीय विषयी दुसर्या समाजात द्वेष निर्माण करुन दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने या तरुणांनी गैरवर्तन केले. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे 3 वाजता किशोर सुदामराव चव्हाण (रा. दिल्लीनाका, संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी फिरोज गुलाब बागवान (रा. मोमीनपुरा), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इकबाल बागवान, सोहेल इकबाल शेख, अल्ला अजीज शेख, हमजा शेख, साबीर शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजान गफ्फार याचा मुलगा (नाव माहित नाही), मारुफ अस्लम बागवान व इतर 100 ते 120 (सर्व रा. संगमनेर) जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 270/2022 भारतीय दंड संहिता 295 (अ), 296 (अ), 153 (अ), 453 (अ), 143, 147, 120 (ब), 323 व अनुसुचित जाती जमाती अधिनियम सुधारित कायदा 2015 ते कलम 3(1), (यू)(व्ही)(डब्ल्यू), 3 (2) (5, ए) प्रमाणे दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी मारुफ अस्लम बागवान (वय 20, रा. बागवानपुरा, संगमनेर), अब्दुल समद जावेद कुरेशी (वय 21, रा. भारतनगर, संगमनेर) यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे.

Post a Comment