गेले अनेक महिने एस टी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण राज्यात सुरू आहे.श्रीरामपूर डेपो मध्ये काही कर्मचारी हजर झालेले असल्याने नगर,पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी ठिकाणच्या बसगाड्या सुरू आहेत. मात्र बहुतांश वेळ बसस्थानकामध्ये शुकशुकाट असतो. याचाच फायदा घेत काळ्या पिवळ्या गाड्या चालवणाऱ्या चालकांनी बसस्थानकाचा ताबा घेतला आहे. नगर, संगमनेर,नेवासा या मार्गावर श्रीरामपूरातून काळया पिवळ्या गाड्या चालू असल्याने जनतेची बऱ्यापैकी प्रवासाची सोय झालेली आहे हे निर्विवाद. पूर्वी या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून भरल्या जात होत्या. मात्र त्या बंद असल्यामुळे रिकाम्या बसस्थानकाचा सदुपयोग म्हणून कि काय या सर्व काळात या खाजगी गाड्या बसस्थानकामध्ये एका रांगेत उभ्या केल्या जातात आणि तेथूनच भरल्या देखील जातात. त्यामुळे श्रीरामपूरचे बसस्थानक एस टी महामंडळाने काळ्या पिवळ्या गाड्याची वाहतूक करणाऱ्या लोकांना कराराने दिले आहे कि काय ? असा प्रश्न सध्या श्रीरामपूरकरांना पडला आहे.
नजिकच्या काळामध्ये एस टी बसेस सुरू होण्याची शक्यता नाही . त्यामुळे जनतेची गैरसोय दूर होण्यासाठी या काळया पिवळ्या गाड्यांचा निश्चितपणे मोठा हातभार लागला आहे . प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम मोडून या गाड्यांमधून प्रवासी भरले जातात . त्याबद्दल ही नागरिकांची तक्रार नाही . कारण गरजू लोकांना प्रवास करणे क्रमप्राप्त असल्याने ते या गाड्यांमधील सर्व प्रकारच्या गैरसोयी सहन करत आपला प्रवास करीत असतात . नगर लाईनवर चालणारे गाड्यांचे चालक हे किमान सौजन्याने तरी वागतात . मात्र संगमनेर लाईन वर चालणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत . त्यात ही आता या गाड्यांनी राजरोसपणे श्रीरामपूरच्या बसस्थानकावर ताबा मिळविल्याने व तेथूनच या गाड्यांची वाहतूक होत असल्याने भविष्यामध्ये काळा पिवळ्या गाड्यांसाठी श्रीरामपूरचे बसस्थानक हे माहेर घर बनण्याची शक्यता आहे . एस टी च्या स्थानिक अधिकार्यांच्या आशीर्वादाने या गाड्या एसटी स्टँड मध्ये लावल्या जातात .ज्या अधिकार्यांच्या आशीर्वादाने या गाड्या बस स्थानकात लावण्यात येत आहेत त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांनी एस टी महामंडळाच्या जिल्हा नियंत्रक यांच्याकडे केली आहे.
Post a Comment