मतदार नोंदणी जागृती अभियानाचा परिणाम म्हणून शहरातील तृतीयपंथी मतदारांनी आज स्वयंप्रेरणेने आपली नावे तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेकडे नोंदविली. तृतीयपंथीयांचे प्रमुख दिशा शेख यांच्या नेतृत्वाखाली अकरा मतदारांनी तहसील मध्ये येऊन आपले मतदान नोंदणीचे अर्ज भरून दिले. याकामी या कक्षाचे प्रमुख शकील बागवान तसेच निवडणूक शाखेचे संदीप पाळंदे यांनी सदर अर्ज भरून व स्वीकारून या नोंदणीसाठी अनमोल सहकार्य केले.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मुदत पाच डिसेंबर पर्यंत वाढविल्याने गेल्या आठवडाभरामध्ये तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने मतदान नोंदणी अभियानासाठी जनजागृती मोहीम राबवली. त्याचे परिणाम स्वरूप शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने नवीन मतदारांनी नोंदणी केली असून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागातील स्थलांतरित झालेल्या मतदारांनी देखील आपले अर्ज भरून दिले आहेत. शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी ही निवडणूक शाखेतील संदीप पाळंदे व त्यांचे सहकारी मतदार नोंदणीसाठी कार्यरत आहेत. प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मतदार नोंदणी मोहीम मतदारांपर्यंत पोहोचून श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हे अभियान यशस्वी केल्याबद्दल निवडणूक शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment