प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. शेती पंपाची वीज बील वसूली ताबडतोब बंद करून शेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे. अशा मागण्या आंदोलन कर्त्यांनी केल्या होत्या. आंदोलन सुरू होऊन पंधरा मिनिटे झाली होती. पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळी दाखल होताच पोलिस फौजफाट्याने धाक दडपशाहीने कार्यकर्त्याची धरपकड सुरू केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. तर काही कार्यकर्त्यांची उचल बांगडी करून ताब्यात घेतले. यावेळी पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांची चांगलीच झटापट झाली. यामध्ये पोलिस वाहनाची खिडकीची काच फोडण्यात आली. पोलिस प्रशासना विरोधात जबरदस्त घोषनाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, मधुकर शिंदे तसेच इतर मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा उपस्थित होता.
त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाने हे आंदोलन दडपशाहीने धुळीस मिळवले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड सुरू होती. तर प्रहार संघटना, आरपीआय व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, आरपीआयचे जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे, लहानु तमनार, एकलव्य संघटनेचे नामदेव पवार आदि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. याबाबत दुपारी उशिरापर्यंत पोलिस प्रशासनाची कारवाई सुरू होती.
Post a Comment