दुचाकी व पेट्रोल चोरीने श्रीरामपूरकर हैराण पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे, जनतेची मागणी.

श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या भागांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या भागातील कॉलन्यांमध्ये बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे पेट्रोल चोरून नेण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या महिनाभरात शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्ही सध्या तपास करा, शोधा, मग आमच्याकडे या, अशी उत्तरे दिली जातात. वॉर्ड नंबर 2 मध्ये तर एका महिलेने आपल्या घरासमोरून चोरीला गेलेली गाडी स्वतः शोधून काढली आणि श्रेय मात्र पोलिसांनी घेतले अशीही चर्चा आहे.माजी आ. स्व. जयंत ससाणे यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक सुभाष तोरणे यांची दुचाकी अशीच चोरीला गेली. तिचा अद्याप तपास लागलेला नाही. पत्रकार अनिल पांडे यांच्या दुचाकी चोरीचाही तपास लागला नाही. वॉर्ड नंबर 7 मध्ये एका घरासमोरून गेलेली दुचाकी सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असताना चोरटे अद्याप सापडलेले नाहीत.

दुसरीकडे मिल्लतनगरमध्ये असलम बिनसाद तसेच गुलाबभाई शेख यांच्या घरासमोरील गाड्यांमधून पेट्रोल चोरीला गेले आहे. फातेमा कॉलनी, मिल्लतनगर, संजयनगर परिसरातील अनेक घरांसमोरून गाड्यांतून पेट्रोल चोरून नेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पेट्रोल चोरी करणारी मोठी टोळी श्रीरामपूरमध्ये कार्यरत असून त्याच्या जोडीला वॉर्ड नंबर दोन मधील धनगर वस्ती परिसरातील अनेक लोक पेट्रोल चोर्‍या करतात. पोलिसांनाही ते माहिती आहे. परंतु तडजोडीतून याकडे दुर्लक्ष केले जाते. यापूर्वी मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. आता पेट्रोल चोरीच्या घटना वाढत आहेत.सर्वसामान्य माणसे आपली वाहने घराबाहेर लावतात. परंतु चोरटे त्यावर डल्ला मारतात. वरून पोलीस तपास होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहराच्या सर्वच भागात पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी. चोरट्यांशी संबंध असलेल्या पोलिसांच्या तातडीने बदल्या कराव्यात. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी श्रीरामपुरात येऊन शांतता कमिटी तसेच प्रत्येक भागातील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन हे प्रश्न समजून घ्यावेत, अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget