समनापूरमध्ये डिटोनेटरचा स्फोट करून एटीएम फोडले 3 लाखाची रोकड लंपास.
संगमनेर प्रतिनिधी-अज्ञात चोरट्याने डिटोनेटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून या मशिनमधील 3 लाख 17 हजार रुपयांची रोकड व 2 हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर चोरुन नेल्याची घटना काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील समनापूर येथे घडली.समनापूर येथील राजेंद्र रोकडे यांच्या मालकीच्या गाळ्यामध्ये इंडीया वन लिमीटेड या कंपनीचे एटीएम मशिन आहे. अज्ञात चोरट्याने काल पहाटे डिटोनेटरचा स्फोट घडवून हे मशिन फोडले. या मशिनमधील रक्कम घेवून त्याने पोबारा केला. एटीएम मशिन फोडल्याबाबतची घटना सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली. कामगार पोलीस पाटील गणेश शरमाळे यांनी या चोरीची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळविली.या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत श्वान पथकाला व ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले. याबाबत धर्मेंद्र वर्मा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 671/2021 भारतीय दंड संहिता 379, 427, भारी पदार्थ कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाने करत आहे.
Post a Comment