राहाता :-मोठ्या शहरा पाठोपाठ आता राहाता शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही व्हाईटनर नशेच्या जीवघेण्या व्यसनांमध्ये तरुणाई अडकल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान करणार्यांना व्यसन लागले असा आपल्याकडे सहज समत आहे. अशांची संख्या प्रामुख्याने मोठी आहे. परंतु सध्या राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. प्रामुख्याने 16 ते 25 वयोगटातील तरुणांना हे व्यसन लागले आहे. राहाता तालुक्यात शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे तसेच तालुक्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.परप्रांतीय तरुण रोजगारासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या संगतीत राहून येथील तरुणांनी अनेक व्यसने लावून घेतली आहेत. यामध्ये व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी शाळेत न जाता हे व्यसन करतात. हल्ली जनरल स्टोअर्समध्ये व्हाईटनरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. काही वर्षांपूर्वी कोरॅक्स, आयोडेक्स औषध सेवन करून तरुण वर्ग व्यसनाधीन झाला होता. व्हाईटनर रुमालावर टाकून त्याचा गंध घेऊन व्यसनाचा फंडा परिसरात तरुणांच्या हाती लागला आहे. या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.राहाता शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. राहाता शहरात परराज्यातून गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीसाठी आणला जातो व तो तालुक्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी दिला जातो. शहरात अवैधरित्या गुटखा विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात असताना पोलीस प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. अनेकदा पोलिसांनी होलसेल गुटखा विक्री करणार्यांना रंगेहाथ पकडले, परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.राहाता शहरात बस स्थानक, व्यापारी संकुल, नगरपरिषद बगीच्या, कातनाला, पाण्याच्या टाकी परिसर, पिंपळस खटकळी कॅनॉल रोड या ठिकाणी अनेक तरुण
रात्रीच्यावेळी व्हाईटनर, मद्यपान, धूम्रपान अशा विविध नशा करताना दिसतात. शिर्डीत काही वर्षापूर्वी व्हाईटनरची नशा करणार्या मुलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी तात्पुरती कारवाई करून काही काळ या नशेबाज तरुणांवर अंकुश ठेवला होता. परंतु पुन्हा नशा करणार्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयात मुलांना प्रबोधन करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे. राहाता तालुक्यात बेकायदा मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गावठी दारूची विक्री रहिवासी परिसरात राजरोसपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. बेकायदा मद्यविक्रीला एक प्रकारचा परवाना मिळवायचे चित्र आहे. बेकायदा मद्यविक्रीमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. पोलीस प्रशासनाने या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
Post a Comment