श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे गंठण चोरण्याचा प्रकार थत्ते ग्राऊंड परिसरातील उत्सव मंगल कार्यालयातील अपार्टमेंटसमोर घडला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत साई उत्सव अपार्टमेंट, उत्सव मंगल कार्यालयाजवळ, वॉर्ड नं.7 श्रीरामपूर येथे राहणार्या अश्विनी वैभव गोडसे (वय 38) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 जून 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मी साई उत्सव अपार्टमेंटच्या पार्किंगसमोर उभा असताना एक अज्ञात इसम तेथे आला आणि त्याने पत्ता विचारला. पत्ता विचारण्याचा बहाणा करून माझ्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने धक्का देवून ओढून घेतले आणि गेटबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून आरोपी पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अश्विनी गोडसे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत कलम गु.र.नं. 419/ 2021 प्रमाणे भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. समाधान सुरवडे करीत आहेत.
Post a Comment