तरुणीच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण खून.

राहुरी :प्रतिनिधी मिनाष पटेकर-राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख-गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर-मनमाड महामार्गापासून चाळीस फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता. काल (रविवारी) मध्यरात्री अकरा ते दोनच्या दरम्यान खूनाची घटना घडली असावी.  स्थानिक शेतकरी विशाल गिते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते. त्यासाठी गिते नगर-मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते. दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती दिली.  पहाटे चार वाजता वाजता पोलीस

उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक मधुकर शिंदे, उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, कॉन्स्टेबल जालिंदर साखरे, वैभव साळवे, उत्तरेश्वर मोराळे, दिनेश आव्हाड, जानकीराम खेमनर, अण्णासाहेब चव्हाण, गृहरक्षक दलाचे सचिन पवार घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजता नगरवरुन फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ञ व रक्षा नावाच्या श्वानासह पोलीस पथक दाखल झाले. श्वानाने नगर-मनमाड रस्त्यावर पर्यंत माग दाखविला. घटनास्थळी आढळलेल्या फुटलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मृताच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून, नारंगी रंगाची सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे. डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात "शितल" व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत "एस.पी." असे गोंदलेले आहे. मृताच्या पायातील चप्पल घटनास्थळी आढळली नाही.  आसपासच्या परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नाही. चारचाकी वाहनातून तरुणीला घटनास्थळी आणून खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व लॉजींगमध्ये जाऊन मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. परिसरातील नगर-मनमाड रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून, तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.  याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात  व्यक्तींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget