अहमदनगर |प्रतिनिधी-करोना संसर्ग वाढल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश 28 मार्च रोजी जारी केले असून यात 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्यावेळी गर्दी कमी करण्यासाठी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे. यासह नियम कडक करण्यात आलेले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रति व्यक्ती एक हजारांचा दंड आकारण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर आणि फिरण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत निर्बंध टाकण्यात आलेले आहेत.कंटेन्मेंट झोनसाठी यापूर्वीच्या आदेशाव्दारे असलेले सर्व निबंध लागू राहतील. या झोनचे सिमांकन व अंतर्गत कार्यपध्दती याबाबत राज्य व केंद्र शासनाव्दारे वेळोवेळी जारी केलेले निर्देश लागू राहतील. कंटेन्मेंटमध्ये आढळलेल्या करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा यादी करुन शोध घेणे तसेच त्यांना अलग ठेवणे व 14 दिवस संपर्कात राहणे. (80 टक्के संपर्कातील व्यक्तींचा 72 तासांच्या आत शोध घेणे), सार्वजनिक ठिकाणे (उद्याने, बागा इ.) रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान बंद राहतील.उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती एक हजारांचा आकारण्यात येईल. विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुकताना आढळलेल्या व्यक्तीस एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सर्व सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, हे रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत बंद राहतील. परंतु हॉटेल्स, रेस्टॉरंटस् यांना घर पोच सेवा आणि पार्सल सुविधा देण्यास मान्यता राहील.आदेशाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् हे केंद्र शासनाव्दारे कोविड-19 साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधीपर्यत बंद करण्यात येतील. तसेच उल्लंघन केलेले ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्मातंर्गत दंड देखील केला जाईल.सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मनाई राहील. प्रेक्षागृह किंवा नाट्यगृहे यांचा कार्यक्रमास वापर करण्यास मनाई राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्यांतर्गत दंड केला जाईल. तसेच केंद्र शासनाव्दारे कोविड-19 साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधी पर्यत सदर मालमत्ता बंद करण्यात येईल. फक्त विवाह समारंभास जास्तीत-जास्त 50 व्यक्तींना एकत्र येण्यास निबंध असणार नाहीत.मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणी लग्न समारंभासाठी आलेले वर्हाडी, पाहुणे मंडळी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, आचारी व इतर उपस्थित सर्व व्यक्ती मिळून जास्तीत-जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्न समारंभ आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. टेबल, खुर्च्या, पाण्याचे नळ व हाताळण्यात येणारे सर्व वस्तूंचे पृष्ठभाग इत्यादीचे निर्जतुकीकरण करण्यात यावे.मंगल कार्यालय, लॉन्स, मेरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणच्या आस्थापणांना लग्न समारंभासाठी येणार्या सर्व व्यक्तींचे थर्मल स्कॅनॅरव्दारे स्क्रिनिंग करणे तसेच सॅनिटायझर डिस्पेन्सरचा वापर करणेबंधनकारक राहील. लग्न समारंभात शारीरिक अंतराचे पालन करण्यात यावे. दोन व्यक्तींमध्ये कमीत-कमी 6 फुटांचे अंतर ठेवावे, यासह आरोग्य संस्था आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात यावी. शासकीय कार्यालयात तातडीचे काम असणार्यांना प्रवेश देण्यात यावा, तसेच धार्मिक स्थळ या ठिकाणी गर्दी नियंत्रणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
Post a Comment