मिल्लत नगर भागातील दोन्ही नगरसेवक या भागाकडे फिरकत नाहीत. रस्ते, गटारी, पिण्याचे पाण्याची पाईपलाईन या समस्या अनेक दिवसांपासून आहेच. या भागामध्ये जो एक रस्ता तयार केला आहे त्या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली असून इतर रस्त्यांचे डांबरीकरण झाले त्याचवेळी हा रस्ता केला आहे. मात्र या रस्त्याचे डांबर केले कुठे ? असा प्रश्न या भागातील रहिवासी युसुफ लाखानी यांनी विचारला आहे. ओपन स्पेस तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात झाडेझुडपे, गवत वाढले असून यामधून मोठे साप निघतात. नगराध्यक्षांना प्रत्यक्ष जागेवर आणून सर्व परिसर दाखवण्यात आला. त्यांनी लवकरात लवकर सफाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन महिने होऊन देखील ही सफाई झालेली नाही. या भागांमध्ये काही ठिकाणी अजून रस्ते नाहीत. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाईपलाईन नसल्यामुळे सध्या असलेल्या नळांना मोटर लावून देखील पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक मात्र पाणीटंचाईने हैराण झालेले आहेत. पालिकेने तातडीने या भागामध्ये लक्ष द्यावे अन्यथा येत्या नगर पालिका निवडणुकीत प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे.
मिल्लतनगरच्या नागरी समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील नवीन वसाहत असलेल्या मिल्लत नगर या भागाकडे नगरपालिकेचे लक्ष नसून गेल्या पाच दिवसांपासून या परिसरामध्ये कचऱ्याची गाडी देखील फिरकलेली नाही. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे व गवत वाढले असून त्यांची साफसफाई देखील होत नाही. त्यामुळे डास मच्छरांचा प्रादुर्भाव नागरिक सहन करीत आहेत. अनेक वेळा तक्रारी करून देखील नगरपालिका या भागाकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून नगरपालिकेचे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Post a Comment