कोपरगाव ( प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यात पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे व खोपडीसह अनेक गावांमध्ये सोमवारी झालेल्या धो-धो झालेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला.सुमारे 200 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य, वाहून गेल्याने अनेकजण बेघर झाले आहेत. शेतात पाणी असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चाळींमधील कांदाही भिजला आहे.धोत्रे येथील 200 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकजण बेघर झाले. मंगळवारी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी कर्मचार्यांच्या चार टीम करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.येवला तालुक्यातील उंदीरवाडी व इतर गावातील छोटे छोटे बंधारे पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होते. जास्तीचे पाणी कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये घुसल्याने शेकडो घरे पाण्यात गेली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तसेच कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे व खोपडी परिसरात झालेल्या पावसाने शेतात पाणी साचून शेताचे अक्षरशः तळे होऊन बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी, मुग आदी पेरणी झालेल्या जवळपास 80 ते 90 टक्के पिकांचे नुकसान झाले असून त्याचबरोबर कांद्याच्या चाळीत पाणी शिरून साठविलेल्या कांदे पावसाच्या पाण्याने भिजल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच फळबागाही कोलमडून पडल्या.धोत्रे येथील आदिवासी वसाहत व दलित वस्ती शहा वसाहतीमधील अनेक घरात पाणी शिरले. अन्न धान्य कपडे महत्वाची कागदपत्रे ओले झाले होते. शेतात नुकतीच पेरणी केलेले बियाणे या पावसात वाहून गेले.ग्रामस्थांचे दैनंदिन वापराचे साहित्य देखील वाहून गेल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.मंगळवारी सकाळी 8 वाजेपासूनच तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान आ. आशुतोष काळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पंचायत समिती सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी पाहणी करून मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकास घटनास्थळी पाठवून पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना रात्री उशिरापर्यंत मदत केली, नुकसानग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली.
Post a Comment