शिर्डी,दि.12 : कोरोना व्हायरस संक्रमणाविरुध्द देश आणि राज्यपातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक यांना प्रशासनातर्फे कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांनांची माहिती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी कोपरगांव पंचायत समितीमार्फत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थी मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.
कोपरगांव शहर आणि तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे सहभागातून कोविड-2019 संबंधी समाजातील सर्व स्तरातून जागृती व प्रबोधन करणारे संदेश व्हाटसृ ॲपच्या माध्यमातून पाठविण्यात आले, दूरध्वनी व मोबाईलद्वारे कोविड-2019 संबधी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांशी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी चर्चा केली. दिनांक 16 एप्रिल ते 3 मे, 2020 या कालावधीत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आलेले उपक्रम पूर्णपणे त्यांच्या घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी कोणतेही वेगळे साहित्य विकत आणावे लागले नाही हे या स्पर्धेचे वैशिष्टय होते. कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त करणे हा राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा उददेश होता.
स्पर्धांसाठी खालीलप्रमाणे इयत्ता 1 ते 5 साठी प्राथमिक गट, इयत्ता 6 ते 8 साठी उच्च प्राथमिक गट, इयत्ता 9 ते 10 साठी माध्यमिक गट आणि इयत्ता 11 ते 12 साठी उच्च माध्यमिक गट तयार करण्यात आले होते. शाळास्तर स्पर्धांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी गटनिहाय शाळेतील प्रथम क्रमांकाच्या रांगोळी, चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, कविता लेखन व हस्ताक्षर यांचा फोटो केंद्रप्रमुख यांचेकडे पाठवला. केंद्रप्रमुख यांनी गटनिहाय केंद्रातून प्रथम क्रमांकाचा फोटो तालुकास्तरावरील स्पर्धा समितीकडे पाठवला. यामधून तालुकास्तर समितीकडून स्पर्धानिहाय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निश्चित करण्यात आले. विजयी स्पर्धकांना प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. उपक्रमांच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गटसाधन केंद्र कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले. शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे शिर्डी, कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे व पंचायत समिती गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

Post a Comment