श्रीरामपूर(प्रतिनिधी)- लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर श्रीरामपूर शहरातील दुकाने सुरू करणे अथवा बंद ठेवण्याबाबत फक्त बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. आधीच अनेक कारणांमुळे अडचणीत आलेले श्रीरामपूरकर बाजारपेठेच्या संदिग्धतेमुळे हवालदिल झाल्याने माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यापारी हितासाठी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, भाजयुमो सरचिटणीस अक्षय वर्पे, मनसेचे सचिव स्वप्नील सोनार यांनी विखे पाटलांची भेट घेऊन केली.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दुकाने बंद अथवा सुरू करण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. प्रशासकीय पातळीवर सध्या बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तरीही प्रशासकीय भवनात या विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत दररोज बैठकांचा सिलसिला सुरू आहे. वेगवेगळे राजकीय पुढाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहून एकही ठोस निर्णय न झाल्याने व्यापारी वर्गही हवालदिल झाला आहे. एकीकडे सर्वसामन्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे बाजारपेठेबाबत ठोस निर्णय लांबणीवर पडला आहे. हवालदिल झालेली व्यापाऱ्यांना मदतीसाठी कोणाकडे याचना करावी असा प्रश्न पडलेला असताना त्यांना विखे पाटलांनी आधार देऊन प्रशासनास योग्य त्या सूचना द्याव्या अशी मागणी केतन खोरे यांनी केली.
तर स्वप्नील सोनार व अक्षय वर्पे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्याभरात वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत पाच बैठका श्रीरामपूरात झाल्या मात्र एकही बैठकीत व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला नाही. फक्त राजकीय कलगीतुरा बघायला मिळल्याने सक्षम लोकप्रतिनिधी नसलेल्या श्रीरामपूरची वाटचाल अंधारकडे चालली आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी राजकारण वेगळे ठेऊन भूमिका घेणे गरजेचे आहे अन्यथा बाजारपेठ बकाल होईल अशी भीती अक्षय वर्पे व स्वप्नील सोनार यांनी व्यक्त केली.
Post a Comment