शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे अवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, प्रांतधिकारी शशिकांत मंगळुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलिस निरीक्षक अभय परमार, सुनिल पाटील, पी.वाय.कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदि बैठकीत उपस्थित होते.
यावेळी ना.बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच धांदरफळ बु., कुरण, घुलेवाडी येथील परिस्थिती व प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आढावा घेतला. तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी ना.थोरात म्हणाले कि, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र आता नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहुन करु या. नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देवून प्रशासनाने काही कडक नियम केले आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना संकटात महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक विभागांचे कर्मचारी व पदाधिकारी, स्वयंसेवक चांगले काम करत आहेत. या काळात तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करीत गरिब, रोजंदारीवरीलल मजूर व परप्रांतीय कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे काम कौतूकास्पद आहे. आपण राज्यपातळीवर काम करतांना मदत कक्षातून परप्रांतीय मजूर, गोरगरिब यांच्यासाठी सातत्याने काम करत असून दररोज जिल्हानिहाय मदतकार्याचा आढावा घेत आहे. नागरिकांच्या मिळालेल्या सहकार्यातून अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
आ.डॉ.तांबे म्हणाले कि, कोरोना संकटात अनेक शासकीय विभागांचे कर्मचारी सेवा देत आहेत. या सर्वांच्या आरोग्य विम्याबाबत अधिक काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. पावसाळयाच्या सुरुवातीला दरवर्षीप्रमाणे सर्दी, ताप, खोकल्याची साथ येवू शकते. यामुळे घाबरुन न जाता आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, ग्रामीण भागात नागरिकांनी मोठी काळजी घेतली आहे. शहरात अनेक स्वयंसेवक गोरगरिबांना अन्न पाकिटे पुरविण्याचे काम करत आहेत. भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा ऑनलाईन मागणीद्वारे पुरविले जात आहे. सध्याच्या काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी कोरोनाचे रुग्ण, तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती, त्यांना दिलेल्या सुविधा यासोबत प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबांधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तहसीलदार अमोल निकम यांनी परप्रांतीय मजूर व त्यांची सद्य परिस्थिती याबाबत माहिती दिली.
Post a Comment