शिर्डी (प्रतिनिधी) कोरोनाव्हायरस या जागतिक महामारीचा मुकाबला मोठ्या धैर्याने जनता करीत आहे. अशा परिस्थितीत निश्चित रोजगार नसलेल्या नागरिकांची संख्या शिर्डी सह राहाता तालुक्यामध्ये मोठी आहे. त्यामुळे अन्न पाण्याबरोबरच जिवंत कसे राहायचे ही मोठी समस्या नागरिकांसमोर निर्माण झालेली आहे. या तालुक्यातील छोटे-मोठे मोठे व्यावसायिक, शेतमजूर, हातगाडीवाले, धागा लॉकेट विक्रेते, ड्रायव्हर, हॉटेल व्यवसायिक, प्रसाद विक्रेते, चहा आणि पान टपरी चे व्यवसाय चालवणारे, हातावर पोटपाणी असलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात हाल-अपेष्टा गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहेत. या सर्व जनतेला जर खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भरता' करायचे असेल तर शिर्डी नगरपंचायत, राहाता नगरपालिका आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने आगामी किमान एक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी अथवा कोणतेही कर हे माफ करून जनतेच्या दुःखात सहभागी असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ सदाफळ, समीर बेग, विधिज्ञ ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दत्ता साखरे यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डी या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्रामुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक बेरोजगार, व्यवसायिक यांच्या चरितार्थाचे साधन म्हणून शिर्डी तथा राहता तालुक्याकडे पाहिले जाते. परंतु कोरोणा या जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील नागरिक आर्थिक आणि आरोग्यविषयक संकटाला सामोरे जात आहेत. नागरिकांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा.जयंत गायकवाड यांचे मार्गदर्शनात समविचारी युवक नेत्यांनी एकत्र येत पुढील वस्तुनिष्ठ मागण्या सरकारकडे केल्या आहेत.
तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला पाहिजे. या शैक्षणिक वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ केले जावे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तकांची उपलब्धता करून दिली पाहिजे. तालुक्यात असणाऱ्या अनेक शिक्षण संस्थांबरोबरच शिक्षण सम्राटांनी विद्यार्थ्यांकडे कोणतेही शिक्षण शुल्क मागू नये. लॉक डाऊन आडून नागरिकांची शासकीय कामे करण्यात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे तसेच नागरिकांची शासकीय कागदपत्रांची कामे पूर्ण व्हावीत यासाठी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत शेतकऱ्यांसाठी पीक पाण्यासाठी कर्जाची उपलब्धता करून देणे कामी आदेश व्हावेत. शेतकऱ्यांच्या पिकांची अवकाळी पावसाने नुकसान झालेले असल्याने त्यांना संबंधित विमा रक्कम कंपन्यांनी ताबडतोब मंजूर करावी. यासर्व मागण्यांची पूर्तता सरकारने करणे आवश्यक आहे. शिर्डी नगर पंचायत, राहता नगरपालिका आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी नागरिकांना कमीत कमी एक वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी विनाअट तत्काळ माफ करावी.
राहाता शिर्डीतल्या जनतेच्या या अतिशय योग्य आणि जीवनमरणाशी निगडीत न्याय्य मागण्यांसाठी वेळप्रसंगी आंदोलन पुकारण्याचा इशारा प्राध्यापक प्रा.जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ सदाफळ, समीर बेग, ॲडव्होकेट सुनील सोनवणे, दत्ता साखरे यांनी दिला आहे. सदर मागणीच्या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्रांताधिकारी गोविंद शिंदे तसेच तहसीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment