'उम्मती फाउंडेशन' तर्फे श्रीरामपुर शहरातील प्रख्यात मधुमेह व हृदयविकारतज्ञ डॉ.दिलीप पडघन यांना नुकतेच 'कोव्हीड वारीअर' या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उम्मती फाउंडेशनने सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आरोग्यदूतांना सन्मानित करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपुर शहरात १० एप्रिल रोजी एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉ.दिलीप पडघन व प्रयोगशाळा अधिकारी श्री.दिलीप डोखे यांना २८ दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. या दोघांनी सदर कोरोना बाधित रुग्णास स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तात्काळ रुग्णसेवा दिली होती. आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना क्वारंटाईन राहावे लागले होते. अशा आरोग्यदूतांना प्रोत्साहन मिळावे या प्रामाणीक हेतूनेच 'उम्मती'चे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी या डॉक्टर द्वयींचा यथायोग्य सन्मान केला. यावेळी डॉ.पडघन व डोखे यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
सत्कारमूर्ती डॉ.दिलीप पडघन यांनी यावेळी 'उम्मती'च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आवश्यक खबरदारी घेऊन यथायोग्य रुग्णसेवा देऊनही क्वारंटाईन राहावे लागले याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच अश्यावेळी समाजाने व माध्यमांनीही अफवा न पसरविता कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्याऱ्या आरोग्यदूतांच्या पाठीशी उभे राहावे असा सल्लाही दिला. तसेच क्वारंटाईन कालावधीत त्यांना सहकार्य केलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.जमधडे, इतर स्टाफ व मित्र आप्तेष्टांचे त्यांनी विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तौफिक शेख यांनी केले, तर फिरोज पठाण व सोनू शेख यांनी डॉक्टरांना उम्मती व समस्त मुस्लिम समाजातर्फे पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Post a Comment