अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने जाहीर केलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये झाल्याने जिल्ह्यात अनेक सुविधा, बाबींना शुक्रवार (दि.22) पासून जिल्हा प्रशासनाने नव्याने परवानगी दिली आहे. त्यात प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने उघडण्यास, तसेच रिक्षा, टॅक्सी, जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलूनही सुरू होणार असून विवाह, अंत्यविधीला 50 लोक उपस्थित राहू शकतात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. मात्र, दररोज सायंकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत सक्तीने सर्व बंद ठेवण्यात येणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनमधील जिल्हे घोषित केले असून त्यात नगर जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी बुधवारी जिल्ह्यात कोणत्या बाबी सुरू राहतील व कोणत्या बाबींना प्रतिबंध असेल याबाबत आदेश काढले. त्यात प्रामुख्याने कंटेन्मेंट झोन (ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले) वगळता आतापर्यंत बंद असलेल्या बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. याशिवाय सर्व दुकानेही उघडतील. मात्र, याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असेल.अत्यावश्यक सेवेची दुकाने (मेडिकल, पेट्रोलपंप, एटीएम) मात्र त्यांच्या निर्धारित वेळेत सुरू राहतील. दुकानांत गर्दी झाल्याचे आढळल्यास दुकाने त्वरित बंद केली जातील. क्रीडा संकुले, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या होतील. मात्र प्रेक्षक व सार्वजनिक जमावास बंदी असेल. सर्व खासगी व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी असेल. मात्र दुचाकीवर केवळ एकचजण प्रवास करेल. तीन चाकीवर तीन, तर चार चाकीतही तिघांनाच परवानगी असेल. जिल्हांतर्गत बस सेवेला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह व शारिरिक अंतर ठेवून व स्वच्छताविषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.
144 कलम कायम-जिल्ह्यात अनेक व्यवहारांना परवानगी दिलेली असली तरी कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. याचा भंग करणार्यावर कडक करवाईचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
सातच्या आत घरात-अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर, फिरण्यास सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत निर्बंध राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानांत ग्राहकांमध्ये 6 फुटांचे अंतर राखावे व पाच पेक्षा जास्त ग्राहक एका ठिकाणी नसावेत, असे आदेशात म्हटले आहे.
थुंकणार्यावर होणार दंड-सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वा कामाचे ठिकाणी थुंकणार्यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी. सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकी दरम्यान सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत.
हे सुरू करण्यास परवानगी-सलून दुकाने, हॉस्पिटल, क्लिनिक, बाह्यरुग्ण तपासणी, टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी वाहने (चालकासह तिघे), दुचाकी (केवळ चालक), जिल्हांतर्गत बससेवा, मालवाहतूक, उद्योग, बांधकामे, शहरातील व ग्रामीणमधील सर्व दुकाने, बाजारपेठा, ई-कॉमर्सद्वारे वस्तूपुरवठा, खासगी कार्यालये, शासकीय कार्यालये (100 टक्के), कृषीविषयक कामे, बँका आणि वित्तीय सेवा, टपाल व कुरिअर सेवा, तातडीच्या वैद्यकीय कारणासाठी प्रवास, कटिंग, सलून, स्पा, ब्यूटीपार्लर, स्टेडियम (प्रेक्षकांशिवाय), रेस्टॉरंट (केवळ होम डिलीवरीकरिता), बसस्थानक, रेल्वेस्थानकवरील कॅन्टीन, दुय्यम निबंधक कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, विवाह समारंभ, अंत्यविधी (केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत).
हे मात्र बंदच-विमान, रेल्वे, मेट्रो वाहतूक, आंतरराज्य रस्ते मार्गाने प्रवास, आंतरजिल्हा बससेवा, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मॉल्स, धार्मिक स्थळे व मोठ्या गर्दीची ठिकाणे, आठवडे बाजार बंद राहणार. 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षांखालील मुले व गरोदर स्त्रिया यांना घराबाहेर पडता येणार नाही. तथापी बस स्थानक, रेल्वे स्टेशन व विमानतळ येथील कॅन्टीन सुरू ठेवता येतील. केवळ घरपोहच डिलीवरीसाठी रेस्टॉरंटचे किचन सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
Post a Comment