राहाता (प्रतिनिधी)- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुनाच्या गुन्ह्यातील राहाता येथील आरोपीला तपासासाठी घेऊन आलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर आरोपीने कुर्हाडीने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पैठणचे पोलीस उपनिरीक्षक संतोष माने जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपीवर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैठण येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी गोरख विठ्ठल लोखंडे (वय 36) रा. राहाता यास सोबत घेऊन खुनात वापरलेली हत्याराची जप्ती करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, सरकारी दोन पंच व सहाय्यक फौजदार मधुकर मोरे हे खाजगी वाहनाने 20 एप्रिल सायंकाळी सव्वासात वाजता राहाता येथील 15 चारी येथे आरोपीच्या घरी आले होते.यातील आरोपी लोखंडे याने यावेळी त्याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेली लाकडी दांड्या सहीत कुर्हाड देत असताना त्याच कुर्हाडीने तपासी अधिकारी संतोष माने व साक्षीदार यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्यावेळी सदरची कुर्हाड संतोष माने यांच्या हाताला लागल्याने ते जखमी झाले. याचवेळी त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्यांनी आरोपीस पकडून त्याच्याकडून कुर्हाड हिसकावून घेतली.या घटनेप्रकरणी उपनिरीक्षक संतोष माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी गोरख लोखंडे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 353, 332, 333 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती कळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, राहात्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, यांनी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कंडारे करत आहेत.
Post a Comment