अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील उपाययोजना आणखी कडक करण्यात आल्या असून आता खासगी वाहनांना पूर्णत: पेट्रोलबंदी करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक किराणा सामान व दूध विक्रीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधात्मक आदेशांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व आस्थापना, दुकाने बंद करण्याचे, तसेच वाहनांना रस्त्यावर प्रतिबंध करण्यात आला होता. शाळा-महाविद्यालये, सेतू केंद्र, तसेच इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. परंतु आता लॉकलाऊनमध्ये वाढ झाल्याने या आदेशांना आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत व अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये सर्व खासगी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील भरणारे मोठे भाजीबाजारही बंद राहतील. याशिवाय सर्व सेतू, महा- ई-सेवा केंद्र, आधार केंद्र, तसेच सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदविण्याचे कामकाज बंद राहील. ज्या नागरिकांना दाखले अत्यावश्यक आहेत त्यांनी या दाखल्याकरिता आवश्यक लागणारी कागदपत्रे स्कॅन करुन संबंधीत कार्यालयाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावीत. त्यामुळे सर्व नागरिकांना आॅनलाईन पध्दतीने दाखले वितरीत करण्यात येतील.जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, खासगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, अंगणवाड्या, कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.
Post a Comment