श्रीरामपूर (प्रतिनिधी) आम्ही तुम्हांला प्रत्येक वेळी मदत करू. इथं तुमचाच झेंडा वर राहू द्या. पूर्वी आमची हीच भूमिका होती आताही तिच आहे आणि पुढेही तीच राहील, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करण ससाणे आणि श्रीरामपूरकर यांचा संदर्भ देत केले. स्व. जयंतराव ससाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. सदाशिव लोखंडे, आ. लहु कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते. यावेळी प्रगतशील शेतकरी भारत जगधने उक्कलगाव, महिला क्षेत्रात कार्य करणार्या अंबिका पतसंस्थेच्या संस्थापिका सौ. सुशिलाताई नवले, उद्योग क्षेत्रात श्री इम्पेक्सचे अभिजीत कुदळे व राजेंद्र भोंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल डॉ. कु. गौरी शेळके व डॉ. कु. कल्याणी जगरवाल यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. करण ससाणे यांना उद्देशून आपल्या भाषणात ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, तुमचा संसार तुम्हीच करा. आम्हांला श्रीरामपुरात येऊन राज्य करायचं नाही. मात्र आम्ही तुम्हांला प्रत्येक वेळी मदत करू. इथं तुमचाच झेंडा वर राहू द्या. पूर्वी आमची हीच भूमिका होती आताही तिच आहे आणि पुढेही तीच राहील. पाहुण्यांनी मदत करायची असते संसारामध्ये हस्तक्षेप करायचा नसतो. स्व. जयंतराव ससाणे यांनी आपल्या कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनात घर केले होते. काम करण्याचे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्ये होते. ते गेल्याने तालुक्यासह जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र उपनगराध्यक्ष करण ससाणे हे सर्वांना बरोबर घेऊन संघटना टिकून ठेवण्याचे काम करत असून तुमचा प्रभाव करणच्या नेतृत्वाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर केलेले काम लपवून न ठेवता दुसर्याला सांगण्याचे मोठेपण स्व. ससाणे यांच्यात होते. वेळप्रसंगी लोणी व संगमनेरकरांना सांभाळायचे कामही त्यांनी केल्याचा उल्लेखही ना. थोरात यांनी केला. खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, स्व. जयंतराव ससाणे यांची काम करण्याची पध्दत आदर्शवत होती. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी श्रीरामपूर शहर व तालुक्याचा विकास साधला. आ.डॉ. सुधीर तांबे म्हणाले, स्व. जयंतराव ससाणे यांनी अथक परिश्रमातून श्रीरामपूरचा विकास साधला. सामान्यांविषयी त्यांना तळमळ होती. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी मोठा विकास केला. धडाडीचा व कल्पकता असलेला नेता आपल्यातून निघून गेला हे आपले दुर्देव आहे.आ. लहु कानडे म्हणाले, कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्व पदे स्व. जयंतराव ससाणे यांनी भूषविली. शहराचा चेहरामोहरा बदलला. तर स्व. ससाणे यांनी आपल्या कर्तबगारीने नाव सर्वदूर पसरविले. सचिन गुजर म्हणाले, चिरकाल लोकांच्या मनात राहिल असे काम व्हावे या संकल्पनेतून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. द्वेषाच्या, अडवाअडवीच्या राजकारणापलिकडे चांगले काम व्हावे, ही संकल्पना स्व. ससाणे यांनी साकारली. दूरदृष्टी, प्रचंड सहनशिलता असलेले ते व्यक्तिमत्व होते. करण ससाणे म्हणाले, प्रामाणिक हेतू ठेवून काम केले पाहिजे, या स्व. जयंतराव ससाणे यांच्या शिकवणीप्रमाणे आमचे प्रामाणिक काम सुरु आहे. श्रीरामपूरच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, सौ. दिपालीताई ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय छल्लारे, ज्येष्ठ नेते जी.के. बकाल पाटील, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, माजी सभापती इंद्रभान थोरात, पं.स. सदस्य अरुण पाटील नाईक, डॉ. वंदनाताई मुरकुटे, अशिष धनवटे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक मुजफ्फर शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सुभाष तोरणे यांनी मानले.
Post a Comment