श्रीरामपूर (प्रतिनिधी ) राज्याचे महसूल मंत्री, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्ह्याचे सुपुत्र नामदार बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस असून शहरांमध्ये पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देणारे फलक मोठ्या प्रमाणावर झळकले आहेत. त्यामुळे तो शहरात एक चर्चेचा विषय झाला आहे. आमदार लहू कानडे यांच्या पुढाकाराने शहराच्या विविध भागांमध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. यापूर्वीसुद्धा थोरात यांचे वाढदिवस जिल्ह्यात आणि संगमनेर मध्ये मोठ्या उत्साहात साजरे झाले आहेत. परंतु श्रीरामपुरात पूर्वी त्यांचे असे आणि एवढे फलक कधी लागले नव्हते. यापूर्वी बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे काँग्रेस पक्षात असताना माजी आमदार जयंत ससाणे व भाऊसाहेब कांबळे हे विखे गटाचे म्हणून संबोधले जात होते. कै. ससाणे यांनी दोन्ही नेत्यांशी वैयक्तिक संबंध चांगले ठेवलेले होते .तरीपण थोरातांच्या वाढदिवसाचे फलक कधीच श्रीरामपुरात लागले नाहीत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी करण ससाणे यांना थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बसवले मात्र विखे यांच्या दबावापोटी पंधरा दिवसातच त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर ससाणे गटाने लोकसभेला सदाशिव लोखंडे यांचे उघडपणे काम केल्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर विधानसभेच्या वेळी विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र ससाणे गटाने त्यांची साथ सोडून पुन्हा थोरात गटाशी समझोता केला व काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहू कानडे यांचा हिरीरीने प्रचार करून त्यांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असून करण ससाणे यांना जिल्हा बँकेची उमेदवारी मिळणार आहे. जिल्हा बँकेत थोरात गटाचे वर्चस्व असल्यामुळे व पंचायत समितीमध्ये ससाणे गटाच्या वंदना मुरकुटे यांना साथ न देता विखे यांनी संगीता शिंदे यांना सभापती केल्याने सध्या ससाणे गट व विखे गटात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे देखील ससाणे गटाने थोरात गटाशीजवळीक साधली असल्याची चर्चा शहरांमध्ये आहे. आमदार लहू कानडे यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांचा विश्वास संपादन केला असून कानडे यांना उमेदवारी देण्यामध्ये थोरात यांचा प्रमुख सिंहाचा वाटा आहे. तसेच कानडे यांना निवडून आणण्यासाठी थोरात व आमदार सुधीर तांबे यांनी श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये जातीने लक्ष घातले होते .त्यामुळे कानडे यांनी आपले नेते म्हणून थोरात यांचा वाढदिवस तालुक्यामध्ये दिमाखात साजरा करण्याचे ठरवून शहरासह तालुक्यात विविध गावांमध्ये देखील थोरात यांचे वाढदिवसाचे फलक लावले आहेत. बाळासाहेब थोरात एक शांत, संयमी व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून राज्यात परिचित आहेत. त्यांचे नेतृत्व ससाणे व लहू कानडे यांनी मान्य केल्यामुळे श्रीरामपूरच्या विकासाला देखील आता थोरात यांचा हातभार लागेल. त्यांचे मामा कै. अण्णासाहेब शिंदे व रावसाहेब शिंदे यांच्यामुळे देखील थोरात यांचे श्रीरामपूर शी जुने ऋणानुबंध आहेत. त्यांचा शहरात चाहता वर्ग देखील आहे. त्याचबरोबर शहरातील थोरात यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आज त्यांचा वाढदिवस दिमाखात साजरा करण्याचे नियोजन केले आहे.
Post a Comment