श्रीरामपूर (प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे जिल्हा भरात 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान उर्दू सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याची सांगता आज शनिवारी 15 फेब्रुवारी उर्दू दिनी शहरात उर्दू जुलूस काढून करण्यात आली. या उर्दू जुलूस मध्ये शहरातील नऊ उर्दू माध्यमाच्या शाळांचे तीन हजार विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात समारोपाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अॅड. जयंत चौधरी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मुक्तार शहा. कलीमभाई कुरेशी, रज्जाकभाई पठाण, हाजी जलील काझी, विषय तज्ञ शाहीन अहमद,मुख्याध्यापिका जबीनखान, परवीन शेख, जैद मिर्झा, नसीम शेख, मोहम्मद ईमदादुल्लाह, नाझिया शेख, मजीद बागवान, अस्मा शेख तसेच मोहम्मद उमर बागवान, वसीम अहमद,मुद्दस्सर सय्यद,अल्ताफ शाह,एकबाल काकर, फिरोज पठाण, मोहम्मद आसिफ आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अहमदनगर जिल्हा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँकेचे संचालक व नगरपालिका शाळा क्रमांक पाच चे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी सांगितले की उर्दू साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यात ऊर्दू सप्ताह साजरा करण्यात येतो. देशभरात असा सप्ताह साजरा करणारी अहमदनगर उर्दू साहित्य परिषद ही एकमेव संस्था आहे. यावर्षी जिल्ह्यातील 87 शाळांनी या उर्दू सप्ताहामध्ये सहभाग घेतला. वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये उर्दू भाषेचे महत्व व इतिहास, गीत, गजल गायन, हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, उर्दू जुलूस असे कार्यक्रम जिल्हाभर घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील 15000 उर्दू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पुढील महिन्यांमध्ये राज्यस्तरीय ऊर्दू शिक्षण परिषद श्रीरामपूर येथे घेण्यात येणार असून सर्वसहभागी शाळांना सन्मानचिन्ह व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक मुक्तार शहा यांनी उर्दू साहित्य परिषदेच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देऊन उर्दू भाषेची गोडी ही मनावर भुरळ पाडणारी असून ही गोडी वाढावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अॅड. जयंत चौधरी यांनी व्हाट्सअप च्या एका मेसेजवर जिल्हाभरांमध्ये हा सप्ताह साजरा झाला, ही एक फार मोठी बाब असून याच पद्धतीने उर्दु शाळांमधून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन चांगले व दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचे आवाहन त्यांनी केले . उर्दू सप्ताहमध्ये सहभागी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचा साहित्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून हा जुलूस नगरपालिका परमवीर शहीद अब्दुल हमीद नगर पालिका शाळा क्रमांक पाच च्या प्रांगणात विसर्जित झाला. रस्त्यात ठिकठिकाणी जूलूसचे स्वागत करण्यात आले. उम्मती फौंडेशनतर्के जुलूस मधील सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप सोहेल बारूदवाला व त्यांच्या सहकार्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकबाल काकर, मोहम्मद आसिफ, उमर बागवान, वसीम अहमद आदींनी केले. आभार अल्ताफ शाह यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एजाज चौधरी, साबिर शाह, अरबाज पठान, शाहनवाज, युवराज पाटील, सुयोग सस्कर, शहजाद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment