बुलडाणा - 15 जानेवारी
भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमाच्या वतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळयास आज बुधवार ता.15 पासून हिवरा आश्रम ता.मेहकर येथे सुरूवात होत असून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या आसनस्थ रथारूढ प्रतिमेची सवाद्य शोभा यात्रा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
या शोभायात्रेसाठी पंचक्रोशीतील दिंड्या,पालख्या व भजनी मंडळे यांचे विवेकानंद नगरीकडे आगमन सुरू झाले आहे. दि 15 जानेवारी ते 17 जानेवारी असे तीनही दिवस यानिमित्त भरगच्च सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शेवटच्या दिवशी तीन लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून सांगता करण्यात येईल. तीनही दिवस सकाळी थुट्टे शास्त्री महाराज यांचे व्याख्यान तर दि.15 जानेवारी रोजी विवेकानंद आश्रम संगीत विभागाचे अनुभूती गायन व अभंग गायन,हभप येवले शास्त्री महाराज यांचे प्रवचन होईल. हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांचे कीर्तन,डॉ.विकास बाहेकर यांचे प्रवचन,विवेकानंद विचारदूत जान्हवी केळकर यांचे व्याख्यान,हभप महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन पार पडणार आहे. विवेकानंद जन्मोत्सव हा व्हिलेज ते ग्लोबल असा सर्वदूर पोहोचला असून, तीनही दिवस चालणा-या भरगच्च कार्यक्रमांचे विवेकानंद आश्रमाच्या युट्यूब वाहिनीसह सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. गतवर्षी तब्बल साडेचार लाख भाविक व भारतीयांनी हे लाईव्ह प्रक्षेपण जगाच्या विविध भागात पाहिले होते. त्यादृष्टीने विवेकानंद आश्रमाच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाने चोख नियोजन केले आहे. तीनही दिवसांच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांनी केले आहे.
Post a Comment