राहाता (तालुका प्रतिनिधी) राहाता पालिकेचे डास प्रतिबंधक फॉगिंग करताना चार जणांना डिझेल व पेट्रोलची अफरातफर करताना प्रभारी आयएएस महिला मुख्याधिकारी यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 100 दिवसांत दोन लाख 16 हजार रुपयांची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.ही घटना राहाता शहरात जंगल प्रभागात बुधवारी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राहाता पोलिसांनी किरण बाळासाहेब थोरात, ललित सुनील निकाळे, अविनाश कैलास निकाळे, सागर राजू कासार या चार जणांना या अफरातफर प्रकरणी तसेच पालिकेचे वाहन घंटा गाडी विना परवानगी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले म्हणून अटक केली.याबाबतची हकीगत अशी की राहाता पालिकेच्या डास प्रतिबंधक फॉगिंगचे टेंडर एका खाजगी कंपनीला दि 10 जानेवारी 2019 पासून दिले होते. त्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोल पालिका पुरवीत होती. विश्वसाने दररोज दिल्या जाणार्या पेट्रोल व डिझेलमधे अफरातफर करून टेंडर दिल्यापासून ते 11 डिसेंबर 2019 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत असे 100 दिवसांत डिझेलच्या दोन हजार लिटरचे 1 लाख 36 हजार रुपये व पेट्रोलच्या एक हजार लिटरच्या 80 हजार रुपयांची अशी एकूण 2 लाख 16 हजार रुपयाची अफरातफर केली. तसेच पालिकेच्या मालकीचे वाहन घंटा गाडी विना परवानगीने स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. या प्रकरणी चौघा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करन्यात आला असून चारही जणांना अटक करन्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.गेल्या तीन महिन्यापासून राहाता शहरात डेंग्यू मलेरिया, थंडी ताप या साथीच्या रोगाने संपूर्ण राहाता शहराला विळखा घातला असताना शहरात फॉगिंग करावी अशी मागणी केली जात होती; मात्र प्रत्यक्षात औषध फवारणी होत नव्हती. यामुळे शेकडो नागरीक आजारी पडले. हजारो रूपये दवाखान्यात उपचारावर खर्च करावे लागले. या प्रश्नी सर्वच नगरसेवकांनी तक्रारी करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नव्हते. कधी तरी एखाद्या प्रभागात तात्पुरती फवारणी केली जात असे. मात्र त्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोल रोज पालीकेकडून घेतले जात होते.गेल्या आठ महिन्यांपासून पालिकेला मुख्याधिकारी नसल्याने येथे मनमानी कारभार सुरू होता. प्रभारी मुख्याधिकारी पालिकेकडे फिरकत नव्हते. या संधीचे पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकारी व ठेकेदार यांनी सोनं करून अनेक वेळी फवारणी न करता रोज डिझेल व पेट्रोल घेऊन अफरातफर केली. नुकत्याच पालिकेत मुख्याधिकारी म्हणून आलेल्या आयएएस महिला अधिकारी यांना संशय आल्याने त्यांनी या फॉगिंग करणार्या ठेकेदाराच्या माणसांवर लक्ष ठेवण्यासाठी एक गोपनीय पथक नेमले. सर्व माहिती व काय प्रकार होते हे लक्षात घेऊन सदर महिला अधिकारी यांनी बुधवारी 9:45 वाजेच्या सुमारास ज्या परिसरात औषध फवारणी सुरू होती तेथे पथकासह जाऊन ही चोरी पकडली. सदर कारवाईचे सर्व नगरसेवक व नागरीकांची स्वागत केले असून कर्तव्यदक्ष महिला अधिकारी असीमा मित्तल यांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment