अहमदनगर (प्रतिनिधी) पत्नीच्या नावे काढलेले जीएसटी नंबर बंद करण्यासाठी एजंटामार्फत लाच घेणारा विक्रीकर अधिकारी आज श्रीरामपूरमध्ये एसीबीच्या जाळ्यात सापडले. एजंटगिरी करणारा टॅक्स कन्सल्टंट निघाला. दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.विक्रीकर अधिकारी सुनिल भास्कर टकले (रा. केडगाव) आणि कर सल्लागार निलेश सुरेश हरदास (रा. बेलापुर, श्रीरामपूर) अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत.या दोघांनी जीएसटी नंबर बंद करण्यासाठी 4000 रूपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना एजंट हरदास याच्या कार्यालयातच दोघांनाही एसीबी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. श्रीरामपूरमधील एका व्यक्तीच्या पत्नीने व्यवसाय सुरू करण्यासाठी जीएसटी नंबर काढला होता.परंतु काही कारणास्तव ते व्यवसाय सुरु करु शकले नाहीत. डिसेंबर 2018 मध्ये काढलेला नंबर करण्यासाठी त्यांनी कर सल्लागार असलेल्या हरदास याच्याशी संपर्क साधला. जीएसटी नंबर बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास यांचे मार्फत ऑनलाईन अर्ज करण्यात आला. दंड न भरता खाते बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास याने संबंधित व्यक्तीकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील विक्रीकर अधिकारी असलेल्या सुनिल टकले यांना साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले.पाचशे रुपये कमीशनच्या नावाखाली हरदास यालाही मिळणार होते. आज बुधवारी (दि.13) श्रीरामपुर शहरातील हरीकमल प्लाझा मधील हरदास याच्या कार्यालयात हे दोघे एसीबी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम पवरे, पोलिस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या टीमने ही कारवाई केली. दुपारपर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Post a Comment